पुणे महापालिकेत उद्यापासून प्रशासकराज

  पुणे - पुणे महापालिकेच्या सभागृहाचा (ता. १४) अखेरचा दिवस असणार आहे. निवडणुका होईपर्यंत मंगळवारपासून महापालिकेत प्रशासकराज सुरू होणार आहे. दरम्यान, उद्या शेवटच्या दिवशी महापालिकेची निरोपाची ऑनलाइन सभा होणार आहे. त्यामुळे या शेवटच्या सभेत एकमेकांवर कुरघोड्या, पाच वर्षांच्या कारभाराचा मागोवा घेतानाच सत्ताधारी व विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता असल्याने याकडे लक्ष लागले आहे. कोरोना आणि ओबीसी आरक्षणामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे गेल्या आहेत. पुणे महापालिकेसाठी तीन सदस्यांच्या प्रभाग निश्चित केला आहे. या प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा जाहीर होऊन त्यावर हरकती-सूचना मागविण्यात आल्या. त्याची सुनावणी होऊन प्रारूप आराखड्यात आवश्‍यक असलेल्या बदलांचा अहवाल निवडणूक आयोगाकडे सादर केला आहे. त्यामुळे अंतिम आराखडा जाहीर करून आरक्षणाची सोडत जाहीर करण्याची प्रक्रिया अद्याप शिल्लक आहे. त्यातच राज्य सराकरने विधिमंडळात नवीन कायदा पारित करून निवडणूक आयोगाचे अधिकार स्वतःकडे घेतले आहेत. त्यामुळे या निवडणुका किमान सहा महिने पुढे जातील अशी शक्यता वर्तवली जात आहे. बैठकीत वाद होण्याची शक्यता सोमवारी दुपारी सव्वाबारा वाजता स्थायी समितीची अंदाजपत्रकाची बैठक आहे. यामध्ये भाजपकडून उपसूचना मांडून त्यांना आयुक्तांनी मांडलेल्या अंदाजपत्रकात हवे ते बदल करून घेतले जाण्याची शक्यता आहे. मात्र, आयुक्तांनी मांडलेल्या अंदाजपत्रकात बदल करता येत नाहीत. त्यासाठी मुख्यसभेची मान्यता घ्यावी लागते, असा पवित्रा विरोधकांनी घेतला आहे. त्यामुळे स्थायी समितीच्या बैठकीत वाद होण्याची शक्यता आहे. दुपारी तीन वाजता आॅनलाइन मुख्यसभा होणार आहे. या मुख्यसभेत महत्त्वाचे विषय नाहीत. पण या सभेत गेल्या पाच वर्षांचा मागोवा घेणारी भाषणे व भावनिक भाषणे होण्याची शक्यता आहे. सुविधा काढून घेणार मंगळवारपासून आयुक्त विक्रम कुमार हे प्रशासक म्हणून महापालिकेचा कारभार सांभाळणार आहेत. महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांची कार्यालय, गाड्या व इतर सुविधा काढून घेतल्या जातील. त्याबाबतही प्रशासनाकडून तयारी सुरु झाली आहे. स्थायी समितीत काय होणार? स्थायी समितीच्या बैठकीत आयुक्तांनी मांडलेल्या अंदाजपत्रकावर चर्चा होणार आहे. याचवेळी भाजपकडून स्थायी समिती बरखास्त होऊ शकत नाही, त्यामुळे अध्यक्ष हेमंत रासने हेच पुढील वर्षाचे अंदाजपत्रक मांडणार असे सांगत आहेत. त्यास विरोधीपक्षांनी विरोध केला आहे. उद्याच्या बैठकीत अंदाजपत्रकावर उपसूचना देऊन त्यात बदल करायचे प्रस्ताव भाजपकडून केले जाऊ शकणार आहेत. तर प्रशासनाने राज्य सरकारकडे भाजपच्या दाव्याबाबत खुलासा मागितलेला असून, त्यावर उत्तर न मिळाल्यास प्रशासनाला कठोर भूमिका घ्यावी लागणार आहे. पालिकेच्या इतिहासात प्रथमच प्रशासक मार्च २०१७ मध्ये अस्तित्वात आलेल्या पुणे महापालिकेच्या सभागृहाची मुदत १४ मार्च २०२२ रोजी मध्यरात्री संपणार आहे, त्यामुळे विद्यमान नगरसेवक आपोआप माजी नगरसेवक होणार आहेत. १५ मार्चपासून महापालिका आयुक्त विक्रमकुमार हे प्रशासक म्हणून महापालिकेचे कामकाज सांभाळणार आहेत. पुणे महापालिकेच्या इतिहासात अशाप्रकारे प्रथमच प्रशासक येणार असल्याने त्यांच्या कामकाजाची पद्धत कशी असणार, याबाबतची उत्सुकता निर्माण झाली आहे. पिंपरी पालिकेतही आजपासून ‘प्रशासकराज’ कोरोनामुळे महापालिकेची निवडणूक वेळेत झाली नाही. रविवारी (ता. १३) मध्यरात्री बारा वाजता मुदत संपली. त्यामुळे सोमवारपासून (ता. १४) प्रशासकराज सुरू झाले. त्यांचा कालावधी निश्चित नाही. मात्र, महापालिका निवडणूक झाल्यानंतर पहिली सर्वसाधारण सभा होईपर्यंत प्रशासकाच्या हाती कारभार राहणार आहे. राज्यपालांच्या आदेशानुसार पिंपरी महापालिकेच्या प्रशासकपदी आयुक्त राजेश पाटील यांची नियुक्ती झाली आहे. त्यामुळे आयुक्त आणि प्रशासक अशा दोन्ही भूमिकेत ते असतील. महापालिकेच्या शेवटच्या दिवशी मुख्य सभा आणि स्थायी समितीची बैठक आहे. तसेच मंगळवारपासून प्रशासक येणार असल्याने पुढील कार्यवाही कशी करायची, याबद्दल आयुक्तांशी चर्चा केली जाईल. - शिवाजी दौंडकर, नगरसचिव


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply