पुणे : दौंड शहरात जैन बांधवांचा मूक मोर्चा

दौंड : झारखंड राज्यातील सिध्दक्षेत्र श्री सम्मेद शिखरजी तीर्थस्थानास पर्यटन क्षेत्र घोषित करण्याचा निर्णय मागे घेण्याच्या व जैन तीर्थक्षेत्रांच्या संरक्षणाच्या मागणीसाठी दौंड शहर व परिसरातील जैन बांधवांनी मूक मोर्चा काढला होता. तीन तास जैन बांधवांचे दुकान व व्यावसायिक प्रतिष्ठान पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते.

दौंड शहरातील श्री विमल पार्श्वनाथ जैन मंदिरापासून मूक मोर्चाला सुरवात झाली. झारखंड राज्यातील मधूबन (जि. गिरडीह) येथील महा पर्वतराज श्री सम्मेद शिखरजी क्षेत्र झारखंड सरकारने पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित केल्याने तीर्थक्षेत्राचे पावित्र्य धोक्यात आले आहे. पर्यटन क्षेत्र घोषित करून जैन समाजाच्या अस्मितेवर घाला घातला जात असल्याची भावना जैन समाजात निर्माण झाली आहे. तसेच गुजरात राज्यातील श्री शत्रुंजय तीर्थ येथे मंदिरांची तोडफोड करणे, यात्रेकरूंना त्रास देणे, आदी उपद्रव वाढल्याने या तीर्थाचे संरक्षण करण्याची मागणी या वेळी करण्यात आली.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक - महात्मा गांधी चौक - डॅा. बाबासाहेब आंबेडकर चौक - हुतात्मा चौक - कुरकुंभ मोरी - शालीमार चौक - सहकार चौक मार्गे मोर्चा नवीन प्रशासकीय इमारत मध्ये दाखल झाला. नायब तहसीलदार प्रवीणा बोर्डे यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारले. श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाचे

संघपती शांतीलाल मुनोत, माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया, श्री दिगंबर जैन समाजाचे अध्यक्ष सुशील शहा, श्री श्वेतांबर मूर्तीपूजक संघाचे अध्यक्ष घिसूलाल जैन, स्वप्नील शहा यांच्यासह सकल जैन संघाचे पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चास दौंड व्यापारी महासंघ, मर्चंट असोसिएशन व अ.भा. मराठा महासंघाने पाठिंबा दिला होता.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply