पुणे : देशभरातील सरपंच,अधिकाऱ्यांची पिंपरी-चिंचवडमध्ये उद्यापासून तीन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा

पुणे : स्वच्छ व हरित ग्राम आणि जल समृद्ध गाव या संकल्पांवर आधारित राष्ट्रीय कार्यशाळा पुण्यात उद्यापासून होत आहे. केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने २२ ते २४ सप्टेंबर रोजी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात ही कार्यशाळा होणार आहे. या कार्यशाळेत राज्यातील सर्व जिल्हे आणि देशभरातील असे एकूण १२०० सरंपच, अधिकाऱ्यांची उपस्थिती राहणार आहे.कार्यशाळेचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील, राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह खासदार, आमदार, केंद्र व राज्य शासनातील विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील २० सरपंच आणि देशातील प्रत्येक राज्यातील २० सरपंच कार्यशाळेत सहभागी होणार आहेत. या सर्व सरपंचांमध्ये समूह संवादाच्या कार्यक्रमाचा देखील समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

केंद्र सरकारने निश्चित केलेल्या नऊ संकल्पनांपैकी दोन संकल्पनांवर राष्ट्रीय स्तरावर कार्यशाळा महाराष्ट्र शासनामार्फत होत आहे. पहिल्या दोन दिवशी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाची नवी संकेतस्थळे, मोबाइल उपयोजन (ॲप), व्याख्याने, पाच पॅनेल चर्चा होणार आहे. त्यानंतर राज्यातील व अन्य राज्याचे सरपंच त्यांच्या गावची यथोगाथा कथन करणार आहेत आणि त्यावर चर्चा होणार आहे. समारोप महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या कार्यक्रमाने होणार आहे. शेवटच्या दिवशी पुण्यातील मावळ, मुळशी, साताऱ्यातील वाई आणि महाबळेश्वर तसेच नगर येथील काही गावांना हे सरपंच भेटी देणार असल्याचेही प्रसाद यांनी सांगितले.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply