पुणे : दुचाकीस्वाराला कट मारल्याने दोन गटात हाणामारी, तरुणाची चाकूने वार करुन हत्या, चार संशयितांना अटक

पुणे : पुणे येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका दुचाकीस्वाराला दुसऱ्या चालकाने कट मारल्याचा रागातून दोन गटात हाणामारी झाली. या हाणामारीत एका तरुणाची हत्या झाली असल्याची माहिती उघड झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तुषार जयवंत भोसले (२४) असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. या गंभीर प्रकरणाची विश्रांतवाडी पोलिसांनी तातडीनं दखल घेवून हत्येप्रकरणी चार आरोपींना अटक केली आहे. बाळु अर्जुन शिंदे (48, रा. विश्रांतवाडी), फ्रान्सेस स्वामी ऊर्फ भैय्या ऍन्थोनी स्वामी (20), सर्फराज सलीम शेख ऊर्फ गोल्या ( 20, रा.धानोरी), अकबर शहाबुद्दीन शेख (22, रा. भीमनगर विश्रांतवाडी) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. दरम्यान याप्रकरणी आदित्य भोसले (22) याने विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुषार भोसले आणि भैय्या स्वामी यांच्यात दुचाकीला कट मारल्याच्या रागातून वादविवाद झाला होता. बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास भोसले व स्वामी यांच्यात पुन्हा वाद झाला. त्यावेळी त्यांनी एकमेकांना जीवे मारण्याच्या धमक्‍या दिल्या होत्या. त्यानंतर तुषार भोसले या व्यक्तीने जनता वसाहत व विश्रांतवाडी येथील मित्रांना बोलावून विश्रांतवाडी येथील वडारवस्तीमध्ये भैय्या स्वामीचा शोध घेतला. त्यावेळी ते बाळू शिंदे याच्या घरात घुसले. त्यानंतर हल्लेखोरांनी शिंदे याला जबर मारहाण केली. त्याचा राग आल्याने शिंदे व त्याच्या घराजवळ जमलेले सर्फराज, अकबर हे हत्यारे घेऊन भोसले व त्याच्या मित्रांच्या पाठीमागे धावले. त्यावेळी शिंदे व त्याचे साथीदार आणि भोसले व त्याच्या साथीदारांनी एकमेकांवर दगडफेक केली.

त्यानंतर शिंदे व त्याच्या साथीदारांनी भोसलेला पकडून त्याच्यावर चाकूने वार केले. या हल्ल्यात भोसले गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्‍टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर आरोपी पळून गेले होते. विश्रांतवाडी पोलिसांची दोन पथके आरोपींच्या मागावर होती. पोलिसांनी विश्रांतवाडी येथील वडारवाडी व भीमनगर परिसरातून चारही संशयित आरोपींना अटक केली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply