पुणे जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक कुटुंबातील घरांची मालकी महिलांकडे

पुणे : पुणे जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक कुटुंबातील घरांची मालकी महिलांकडे आली आहे. जिल्हा परिषदेच्यावतीने गाव पातळीवर राबविण्यात आलेल्या गावातील मिळकतीच्या (मालमत्ता) फेरफार मोहिमेत तब्बल सहा लाख ४२ हजार ८६ घरांच्या सातबारा उतारा आणि आठ अ उताऱ्यांवर महिलांच्या नावांची नोंद करण्यात आली आहे. जागतिक महिला दिनाच्यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या विशेष ग्रामसभांमध्ये घरांची मालकी महिलांच्या नावे करण्यासाठी जिल्ह्यात खास महाफेरफार मोहीम आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार या मोहिमेत या नोंदी केल्या असल्याचे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी सांगितले. महिलांच्या नावे घरांची मालकी या मोहिमेत जिल्ह्यात सर्वाधिक जुन्नर तालुक्यात ७७ हजार ८५ महिलांना घरांची मालकी मिळाली आहे. त्यामुळे या मोहिमेत जुन्नर तालुका जिल्ह्यात अव्वल ठरला आहे. मिळकतींवर महिलांची मालकी या मोहिमेला सर्वात कमी प्रतिसाद वेल्हे तालुक्यात मिळाला आहे. या तालुक्यातील १५ हजार ७६१ घरे महिलांच्या नावे नोंदली गेली आहे. या मोहिमेत महिलांच्या नावे घरांची मालकीबरोबरच महिला सुरक्षा, गावातील महिलांचा होणारा घरगुती हिंसाचार रोखणे, बालविवाह व हुंडा पद्धतीला आळा घालणे, लिंग गुणोत्तर प्रमाण सुधारण्यासाठी आदी महिला सक्षमीकरणासाठीच्या विविध बाबींवर लक्ष केंद्रित करण्यात आले. या मोहिमेला गाव पातळीवर चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे यामध्ये जिल्हा परिषद प्रशासनाला चांगले यश आले आहे. गावा-गावांतील प्रॉपर्टी कार्डवर महिलांचे नाव देणे आणि त्याचे वितरण करणे, काही गावांमध्ये अद्ययावत प्रॉपर्टी कार्डचे वाटप करणे, महिला कृषी कामगारांच्या समस्या सोडविणे, महिलांना कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देणे, गावा-गावातील मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे, गावातील सर्व महिलांना बचत गटाचे सदस्य करणे, प्रत्येक गावात एक महिला बचत गट एक उत्पादन संकल्पना राबविणे, गावातील महिलांची सुरक्षा, घरगुती हिंसाचार रोखणे, बाल लैंगिक अत्याचाराला आळा घालणे, गावातील लिंग गुणोत्तर (मुला-मुलींचे प्रमाण) प्रमाणात सुधारणा करणे, बालविवाह व हुंडा पद्धतीला आळा घालणे आणि सुरक्षित मासिक पाळीच्या स्वच्छतेच्या पद्धतींना प्रोत्साहन देणे आदी महिला सक्षमीकरणासाठी आवश्‍यक असलेल्या मुद्यांवर विशेष भर देण्यात आला. महाफेरफार मोहीम अभियान दृष्टीक्षेप
  • जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कुटुंबांची संख्या --- १० लाख ९१ हजार ३०
  • घरांची मालकी महिलांच्या नावे झालेली कुटुंबे --- ६ लाख ४२ हजार ८६
  • जिल्ह्यात अव्वल ठरलेला तालुका --- जुन्नर (७७ हजार ८५)
  • सर्वात कमी नोंदींचा तालुका --- वेल्हे (१५ हजार ७६१)
मिळकतींच्या तालुकानिहाय नोंदी
  • आंबेगाव --- ३९ हजार ८८७
  • खेड --- ६६ हजार ६४०
  • जुन्नर --- ७७ हजार ८५
  • शिरूर --- ६६ हजार ४३८
  • दौंड --- ५८ हजार २२१
  • बारामती --- ४७ हजार ८३७
  • इंदापूर --- ५४ हजार २५७
  • पुरंदर --- ३७ हजार २३१
  • भोर --- ३१ हजार ९२०
  • हवेली --- ५३ हजार ९०७
  • मुळशी --- ५२ हजार २२३
  • मावळ --- ४० हजार ६७९
  • वेल्हे --- १५ हजार ७६१
  • एकूण --- ६ लाख ४२ हजार ८६


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply