पिंपरी-चिंचवड : बुलेट राजांना पोलिसांची धडकी; आता थेट गुन्हा दाखल होणार

पिंपरी-चिंचवड मध्ये कर्कश्य आवाज काढणाऱ्या बुलेट चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. गेल्या सहा महिन्यात दंडात्मक कारवाई करत वाहतूक पोलिसांनी तब्बल २२ लाखांचा दंड वसूल केला आहे. याअगोदर कर्कश्य आवाज करणाऱ्या बुलेटचे सायलेन्सर काढून घेतले जायचं, पण आता थेट ध्वनी प्रदूषण केल्या प्रकरणी बुलेट चालकांवर गुन्हा दाखल केले जात आहेत. ही कारवाई गुरुवारपासून सुरू करण्यात आली असून आत्तापर्यंत ३७ बुलेट चालकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

मुख्य रस्ता, चिंचोळी गल्ली, शाळा आणि कॉलेज परिसरात हमखास बुलेटचा कर्कश्य आवाज करून भरधाव वेगाने गाडी पळवणारे बुलेट चालक सगळ्यांनी पाहिले असतील. बहुतांश वेळा जवळून किंवा चिंचोळ्या गल्लीतून जाणाऱ्या बुलेटमुळे संताप ही अनावर झाला असेल. अशाच बुलेट चालकांवर कारवाईचा बडगा पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलीस उगारत आहेत. पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली आत्तापर्यंत बुलेट चालकांवर २२ लाखांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. 

या अगोदर वाहतूक पोलीस बुलेट चालकांवर कारवाई करत सायलेन्सर काढून घ्यायचे. परंतु, अनेकदा बुलेट चालक सुधारत नसल्याने आता थेट ध्वनी प्रदूषण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येत आहे. अशा प्रकारची कारवाई काल गुरुवार पासून सुरू करण्यात आली आहे. कालपासून ३७ जणांवर कारवाई करण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी सांगितलं आहे. कंपनीने जो सायलेन्सर दिलेला आहे त्यात बदल करू नका अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply