पिंपरी-चिंचवड : जोपर्यंत परवानगी घेतली जाणार नाही तोपर्यंत स्काय डायनिंग हॉटेल बंद राहणार – पोलिसांनी बजावली नोटीस!

अल्पावधीत प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या स्काय डायनिंग हॉटेलला टाळे ठोकण्याची वेळ मालकावर आल्याचे दिसत आहे. कारण, पिंपरी-चिंचवड पोलिसांनी या हॉटेल मालकाला नोटीस बजावली असून, सर्व परवानग्या जोपर्यंत घेतल्या जात नाहीत तोपर्यंत हॉटेल बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

पुण्यातील कासारसाई धरणाच्या शेजारी असलेल्या स्काय डायनिंग हॉटेलच्या मालकाने कुठलीच परवानगी घेतली नसल्याचं समोर आलं आहे. जोपर्यंत परवानगी घेतली जाणार नाही तोपर्यंत हॉटेल बंद ठेवण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत. अशी माहिती पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी दिली आहे. या हॉटेलचं उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या हस्ते झालं होतं.

पुण्यातील कासारसाई धरणाच्या कडेला स्काय डायनिंग हॉटेल उभारण्यात आलं आहे. क्रेनच्या सहाय्याने उभारण्यात आलेल्या हॉटेलवर १२० – १५० फुटांवर उंच नेऊन तिथे १५-२० ग्राहक एकाच वेळी जेवण करू शकतील असं नियोजन करण्यात आलं आहे. जेवणाचा आस्वाद घेत तिथून ३६० डिग्रीचा परिसर पाहता येत होता. यामुळं हे हवेतील तरंगतं हॉटेल अल्पावधीतच ग्राहकांच्या पसंतीस उतरलं होतं. परंतु, आता ते बंद ठेवण्याची वेळ हॉटेलचे मालक आकाश जाधव यांच्यावर आली आहे.

हॉटेल संबंधी आवश्यक असलेल्या परवानग्या घेतल्या नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळं पिंपरी-चिंचवड पोलिसांनी थेट हॉटेल मालक आकाश यांना नोटीस बजावली असून जोपर्यंत आवश्यक असलेल्या परवानग्या घेतल्या जात नाही तोपर्यंत हॉटेल बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या नोटीसमध्ये नेमकं काय आहे? –

उंचावर नेऊन जेवण्याची सुविधा देताय ही बाब अत्यंत धोकादायक आहे. जिल्ह्याधिकारी पुणे, बांधकाम विभाग तसेच अग्निशमन दलाची परवानगी घेऊनच हे हॉटेल सुरू ठेवावं. परवानगी मिळेपर्यंत हॉटेल बंद ठेवण्यात यावं. विना परवाना हॉटेल सुरू ठेवलेलं आढळल तर पूर्णतः आपल्याला जबाबदार धरून कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे नोटीसमध्ये नमूद आहे. त्यामुळं अशा ठिकाणी जाताना ग्राहकांनी कायदेशीर बाबींची खात्री करायला हवी अन्यथा जीवाला आणि कुटुंबाला धोका निर्माण होऊ शकतो. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply