पिंपरी-चिंचवडमध्ये पोलिसांच्या दमदाटीमुळे तरुणाच्या मृत्यूचा नातेवाईकांचा आरोप, उपायुक्तांकडून चौकशीचे आदेश

पुणे : पिंपरी- चिंचवडमध्ये पोलिसांनी दमदाटी केल्यामुळे तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप तरुणाच्या नातेवाईकांनी केला असून, प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी दिले आहेत. नातेवाईकांनी वृषभ मुकुंद जाधवचा मृतदेह दिघी पोलीस ठाण्यासमोर ठेवला होता. चौकशीचे आदेश दिल्यानंतरच मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी दिघी पोलीस, पोलीस उपायुक्त विवेक पाटील आणि संतप्त नागरिक समोरासमोर आले होते. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वृषभ मुकुंद जाधवचा पत्नीसोबत घटस्फोट झाला असून त्याच्या घरी राहण्याची परवानगी न्यायालयाने पत्नीला दिली होती. मात्र, वृषभ सहकार्य करत नसल्याने पत्नीने दिघी पोलिसांची मदत घेतली. पीडित महिला आणि दिघी पोलीस वृषभच्या घरी पोहचले. घराला कुलूप होता. पोलीस आणि वृषभच्या पत्नीला बघून तेथील एकाने मोबाईलमध्ये शूट घेतले. तेव्हा तो मोबाईल पोलिसांनी हिसकावला. पोलिसांनी शूट करत असलेल्या व्यक्तीला समजावून सांगितले आणि ते निघून गेले. काही वेळाने वृषभची पत्नी नातेवाईकांसह तिथे आली. तेव्हा, वृषभही तिथे होता. त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. त्यादरम्यान वृषभ तिथेच खाली कोसळला. त्याला तातडीने रुग्णालयात घेऊन जाण्यात आले, मात्र त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

संतप्त नातेवाईकांनी वृषभचा मृतदेह थेट दिघी पोलीस ठाण्यात नेला. पोलिसांच्या दमदाटीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. प्रत्यक्षात मात्र ज्यावेळी घटना घडली तेव्हा तिथे पोलीस नव्हते, असे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी लोकसत्ता ऑनलाइनशी बोलताना सांगितले आहे. तरी देखील संबंधित प्रकरणी चौकशीचे आदेश दिले असून, दोषी आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply