जादा रकमेचा फायदा पडला महागात; दाम्पत्याने 35 लाखाला घातला गंडा

नाशिक : कापड व्यवसायात रक्कम गुंतविल्यास अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका दाम्पत्याने एकाला ३५ लाख रुपयांचा गंडा घालून फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. तक्रारदार प्रकाश दत्तात्रेय सहाणे (५३, रा. गौरव पार्क, शरणपूर रोड, नाशिक) यांच्याशी संशयित सुनीता मनोज माहेश्‍वरी व मनोज प्रकाश माहेश्‍वरी (पत्ता माहीत नाही) यांनी संपर्क साधला. दरम्यान, माहेश्‍वरी दाम्पत्याने सहाणे यांचा विश्‍वास संपादन केला. त्यांना विश्‍वासात घेऊन कपड्यांच्या व्यवसायात मोठी रक्कम गुंतविल्यास तुम्हाला जादा रकमेचा फायदा करून देतो, असे प्रलोभन दाखविले. सुनीता माहेश्‍वरी व मनोज माहेश्‍वरी यांच्यावर विश्‍वास ठेवून सहाणे यांनी १ मार्च २०१८ ते १ सप्टेंबर २०१९ दरम्यान येवलेकर मळा येथील गंगोत्री अपार्टमेंटमधील १ व २ नंबरच्या शॉपमध्ये माहेश्‍वरी यांना ३५ लाख रुपयांची रक्कम दिली. बरेच दिवस होऊनही सहाणे यांना दिलेल्या पैशाचा जादा मोबदला मिळत नसल्याचे लक्षात आले. याबाबत त्यांनी माहेश्‍वरी दांपत्याकडे विचारणा केली असता पैसे देण्यास टाळाटाळ केली. तसेच, या दाम्पत्याने ३५ लाख रुपयांची रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी घेऊन सहाणे यांचा विश्‍वासघात करून आर्थिक नुकसान व फसवणूक केल्याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक भिसे करीत आहेत.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply