गोविंदांना मुख्यमंत्र्यांची साथ; दहिहंडीतील जखमींना मिळणार शासकीय रुग्णालयात मोफत उपचार

मुंबई: देशासह राज्यभरात आज दहिहंडीचा सण उत्साहात साजरा केला जातोय. अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गोविदांना साथ मिळाली आहे. दहिहंडी उत्सवात दहिहंडी पथकात असलेल्या गोविंदांना दहिहंडी फोडताना दुखापत झाल्यास अशा गोविंदांना शासकीय रुग्णालयात मोफत उपचार मिळणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत काल, गुरुवारीच विधानसभेत घोषणा केली होती. 

आज देशासह राज्यभरात आज दहिहंडीचा सण उत्साहात साजरा केला जातोय. दहीहंडी कार्यक्रमादरम्यान कोणत्याही गोविंदाला दुखापत झाली तर, शासकीय रुग्णालयांमध्ये त्यांना मोफत उपचार देण्यात यावेत अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल. गुरुवारी विधानसभेत केली होती. त्यानुसार राज्यातील सर्व शासकीय दवाखाने, वैद्यकीय महाविद्यालये, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हापरिषदेचे दवाखाने यांना नि:शुल्क वैद्यकिय उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासंदर्भात काढण्यात आलेला शासन निर्णय हा स्थायी असून यावर्षी पासून दर वर्षासाठी लागू राहील अशी माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान दहिहंडीच्या (गोविंदा) "प्रो गोविंदा" स्पर्धा घेण्याची घोषणा काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली होती. स्पर्धेसाठी बक्षीसाची रक्कम शासनातर्फे देण्यात येईल. त्याचबरोबर खेळाडू संवर्गातून शासकीय नोकरी देण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले होते.

तसंच दहीहंडीच्या उत्सवासाठी गोविंदा पथकांचा थरार आपणाला पाहायला मिळतो. त्यामुळे दहीहंडी उत्सवात मानवी मनोरे तयार करताना गोविंदांचा अपघाती मृत्यू झाल्यास किंवा त्यांना दुखापत झाल्यावर मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक सहाय्य मिळणार आहे.

गोविंदा पथकातील खेळाडूंचा दहीहंडीच्या थरावरुन खाली पडून मृत्यू झाल्यास कायदेशीरित्या बाबींनुसार संबंधित वारसाला दहा लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. दहीहंडीच्या थरावरुन प्रत्यक्ष पडून दोन्ही डोळे अथवा दोन्ही हात, दोन्ही पाय अथवा कोणतेही महत्त्वाचे दोन अवयव निकामी झाल्यास त्याला ७ लाख ५० हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य करण्यात येईल. दहीहंडीच्या थरावरुन पडल्याने एक हात किंवा एक पाय किंवा कोणताही एक महत्त्वाचा अवयव निकामी झाल्यास किंवा गंभीर इजा झाल्यास त्याला पाच लाख रुपयांची आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आली आहे.


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply