औरंगाबाद: मुसळधार पाऊस सुरूच, सरला बेटाला गोदावरीचा वेढा; गुरुपौर्णिमेचे कार्यक्रम रद्द

औरंगाबाद - गेल्या पाच दिवसांपासून औरंगाबाद जिल्ह्यात पडणारा संततधार पाऊस आणि नाशिक जिल्ह्यातील धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यात वैजापूर तालुक्यातील सरला बेटाला गोदावरी नदीच्या पाण्याचा वेढा पडला आहे. त्यामुळे आजचा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे गोदावरी नदीत विसर्ग सोडण्यात आला आहे.

सोमवारी सायंकाळी ५५ हजार ७०० क्युसेक्स वेगाने विसर्ग सुरु  नंतर ७७ हजार आणि त्याही पुढे जात मंगळवारी ८७ हजार क्युसेक्सपर्यंत वाढविण्यात आला होता. त्यामुळे गोदावरी खळखळून वाहू लागली आहे. गोदावरीमध्ये वाढत्या पाण्याच्या पार्श्वभूमीवर वैजापूर तालुक्यात गोदावरीकाठी वसलेल्या १७ गावांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या होत्या. सध्या ६२ हजार क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात येत असून, परिसरातील सर्व बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली आहे. नांदूर मधमेश्वर प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वरविण्यात येत आहे. वाढलेल्या पाण्यामुळे सराला बेटाला जोडणाऱ्या लोखंडी पुलावरून सध्या कमरेइतके पाणी वाहत असून कालपासूनच बेटाकडे जाणारा मार्ग बंद करण्यात आला आहे. आज बेटाला पूर्णतः पाण्याचा वेढा पडला असून, गुरुपौर्णिमा असूनही खबरदारी म्हणून शिष्यांना बेटावर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.

सराला बेटावर गुरुपौर्णिमेला औरंगाबाद व नगरसह राज्यभरातील भाविकांची दर्शनासाठी गर्दी होते. परंतु, बेटाला पाण्याचा वेढा पडण्याच्या शक्यतेमुळे कालपासूनच बेटाकडे कुणीही जाऊ नये, असे आवाहन शासकीय यंत्रणेकडून करण्यात येत होते. सरला बेटांचे महंत रामगिरी महाराज यांनीही आज एक व्हिडीओ जारी करून भक्तांना दर्शनासाठी न येण्याचे आवाहन केले. बेटावर भाविक येण्याची शक्यता लक्षात घेऊन या परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विनंती आणि सूचना करूनही भाविक बेटाकडे येतच असून, पोलिस त्यांना पुढे बेटाकडे जाण्यास प्रतिबंध करीत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply