उंड्री : वाहनांच्या गर्दीतून वाट काढताना वाहनचालकांची लागली वाट

उंड्री : उन्हाचा कडाका, अंगातून घामाच्या धारा आणि वाहनांच्या खच्चून गर्दीतून वाट काढताना वाहनचालकांची पुरे वाट लागली. उद्या (रविवार, दि. १ मे २०२२) सर्वच बाजार बंद असल्याने शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी मांजरी उपबाजारामध्ये गर्दी केली होती. त्यामुळे सोलापूर रस्त्यावर वाहनचालकांसह स्थानिक नागरिक, पादचाऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.भाजीपाला घेऊन शेतकरी आणि खरेदीसाठी येणारा व्यापारी वर्ग उघड्या वाहनात बसला होता. मात्र, कडाक्याच्या उन्हामुळे घामाघूम झालेल्या मंडळींचा जीव कासावीस झाला होता. वाहनांच्या गर्दीपुढे वाहतूक पोलीसही हतबल झाले होते.

शेवाळेवाडी (ता. हवेली) येथील मांजरी उपबाजार उद्या (रविवार, १ मे २०२२) रोजी बंद राहणार असल्याने मोठ्या प्रमाणावर शेतमाल घेऊन आला होता, तसेच व्यापाऱ्यांनीही मोठी गर्दी केली होती. त्यामुळे वाहनांची गर्दी वाढल्याने सोलापूर रस्त्यावर मांजरी फाटा ते शेवाळेवाडी दरम्यान वाहतूक ठप्प झाली होती. आज (शनिवार, दि. ३० एप्रिल २०२२) गुलटेकडी येथील बाजार बंद असून, उद्या सर्व बाजार बंद असल्याने सोलापूर रस्त्यावर मांजरी फाटा ते शेवाळेवाडी फाट्या दरम्यान वाहनांच्या खच्चून रांगा लागल्या होत्या. दुपारी एक ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत वाहतूक ठप्प झाल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.

उन्हाच्या काहिलीमुळे जीवाची घालमेल होत होती, तर वाहतूककोंडीतून रस्ता शोधताना सर्वच वाहनचालकांना कसरत करावी लागली. त्यातच दुचाकी, रिक्षासारखी वाहने मध्येच घुसविली जात असल्यामुळे वाहने धडकण्याचे प्रकार झाल्याने तूतू मैमै झाली. सोलापूर रस्त्यावरील वाहतूककोंडी वाहनचालकांना नवीन नाही. दरम्यान, हडपसर वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक मनिषा झेंडे म्हणाल्या की, उद्या महाराष्ट्र दिनानिमित्त बाजार बंद असल्यामुळे शेतकरी-व्यापाऱ्यांनी मोठी गर्दी होती. बाजार समितीनेही नियोजन करण्याची गरज होती. मात्र, तसे त्यांच्याकडून झाले नाही. अनेक वाहने रस्त्यात होती, त्यामुळे वाहतुकीला अडथळा झाला होता. वाहतूक पोलिसांनी वाहतुकीला अडथळा ठरणारी वाहने हटवून वाहतूक सुरळीत केली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply