आमदारांच्या नाराजीची दखल घेतली असती तर ही वेळ आली नसती ; शिवसेनेचे बंडखोर आमदार महेंद्र दळवी यांची प्रतिक्रिया

अलिबाग : आमची व्यथा आम्ही वेळीवेळी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे मांडली होती. मात्र त्यांनी त्याची दखल घेतली नाही. त्यांनी योग्यवेळी आमदारांच्या नाराजीची दखल घेतली असती तर ही परिस्थिती ओढावलीच नसती. आम्ही आजही शिवसेनेत आहोत. पक्षप्रमुखांनी पुन्हा सर्वाना बोलवले तर आम्ही त्यांच्याकडे नक्कीच जाऊ, पण आघाडीत मात्र जाणार नाही असे मत अलिबागचे शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांनी व्यक्त केले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील युती सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर, शिवसेनेचे तीनही आमदार आपआपल्या मतदारसंघात परतले. त्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर रायगडला शिवसेनेचा पालकमंत्री द्या, अशी विनंती पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे केली होती. पण आमचे म्हणणे ऐकले गेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचा पालकमंत्री दिला. त्यांच्याकडून शिवसेना आमदारांची कोंडी करण्याचे धोरण स्वीकारले गेले. विकास निधी दिला जात नव्हता.

शिवसेना आमदारांच्या मतदारसंघातील मंजूर कामांचे श्रेयही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पालकमंत्री घेण्याचा प्रयत्न करत होत्या. त्यामुळे सर्व आमदार आणि पदाधिकारी यांनी बैठक घेऊन पालकमंत्री हटावा म्हणून पुन्हा एकदा तत्कालीन मुख्यमंत्र्यांना विनंती केली. त्याकडेही दुर्लक्ष केले गेले. राज्यातील सर्वच ठिकाणी अशीच परिस्थिती होती. त्यामुळेच शिवसेना आमदारांवर उठाव करण्याची वेळ आली.

आम्ही कुठेही चुकलेलो नाही. गटबाजी होऊ नये, समेट व्हावा अशी आमची आजही प्रामाणिक इच्छा आहे. त्यामुळे पक्षाच्या काही नेत्यांकडून आमदारांवर टिकाटिप्पणी होत असताना, घाणेरडे आरोप होत असताना एकाही आमदाराने त्यावर प्रतिक्रिया दिली नाही. आम्ही संयम राखला आहे. १२ तारखेच्या निकालानंतर परिस्थिती बदलेल असा विश्वास आमदार दळवी यांनी यावेळी व्यक्त केला. मतदारसंघात अडीच वर्षांत जी कामे राहून गेली ती आता आम्ही करून दाखवू. जे नाराज आहे त्यांचीही समजूत काढू. भरत गोगावले यांची मुख्यमंत्र्यांनी पक्षप्रतोद म्हणून नियुक्ती केली आहे. ते आमचे ज्येष्ठ सहकारी आहेत. सलग तीन वेळा निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांना राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळावे आणि रायगडचे पालकमंत्रीपदही त्यांना देण्यात यावे, अशी आमची इच्छा असून ती मुख्यमंत्री नक्कीच पूर्ण करतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply