अंधेरी पूर्व पोटनिवडणूक : “ विजयाची खात्री असती तर भाजपानं माघार घेतली नसती”, पृथ्वीराज चव्हाण यांचं विधान, निवडणुकीतून पळवाट काढण्यासाठी पत्रव्यवहार झाल्याचा आरोप

मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपाने माघार घेतल्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. या मतदारसंघातून भाजपाचे मुरजी पटेल उमेदवारी अर्ज मागे घेणार आहेत. “विजयाची खात्री असती तर भाजपानं माघार घेतली नसती” अशी प्रतिक्रिया यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे. या पोटनिवडणुकीत भाजपाला जर पराभवाचा सामना करावा लागला असता, तर त्याचा परिणाम आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर होईल, असे वाटत असल्यानेच भाजपाने या निवडणुकीतून माघार घेतल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक लढवू नका, असं आवाहन केलं होतं. हे पत्र म्हणजे या निवडणुकीतून पळवाट काढण्याचा भाजपाचा मार्ग होता, असे चव्हाण यांनी म्हटले आहे. “अंधेरी पूर्व मतदारसंघात कुठल्या पक्षाची ताकद आहे, हे लवकरच कळेल. महाराष्ट्राच्या राजकारणात घडलेला प्रकार सामान्य जनतेला आवडलेला नाही, याची जाणीव लवकरच भाजपाला होईल” अशी प्रतिक्रिया चव्हाण यांनी ‘एबीपी माझा’ या वृत्त वाहिनीला दिली आहे.

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून भाजपाचे उमेदवार मुरजी पटेल यांनी माघार घेतल्यानंतर ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निवडणुकीवरुन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विरुद्ध भाजपा असा संघर्ष निर्माण झाला होता. दरम्यान, भाजपा मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी रविवारी राज ठाकरेंची भेट घेत या निवडणुकीत पाठिंबा देण्याची विनंती केली होती. ही विनंती राज ठाकरेंनी फेटाळली होती. या निवडणुकीतून भाजपाने माघार घ्यावी, असा सल्ला देत त्यांनी भाजपाची कोंडी केली होती.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply