हैद्राबाद :  तेलंगणातील निजामाबाद शहरात चार्जिंगदरम्यान ई-स्कुटरच्या बॅटरीचा भीषण स्फोट; एकाचा मृत्यू!

हैद्राबाद : तेलंगणातील निजामाबाद शहरात 19 एप्रिल रोजी रात्री घरात चार्जिंगला लावलेल्या इलेक्ट्रिक स्कुटरच्या (EV) बॅटरीचा स्फोट होऊन एका 80 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर या व्यक्तीची पत्नी आणि नातू गंभीररीत्या भाजले आहेत.

पोलिसांनी बॅटरी उत्पादक Pure EV कंपनीविरुद्ध भादंवि कलम 304-अ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. बी. रामास्वामी असे मृताचे नाव असून तो निजामाबादमधील सुभाषनगर येथील रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या इलेक्ट्रिक स्कुटरच्या बॅटरीचा (EV Battery Blast) स्फोट झाला आहे ती रामास्वामी यांचा मुलगा बी प्रकाश याच्या मालकीची आहे.

बी. प्रकाशने पोलिसांना सांगितले की, मंगळवारी रात्री त्याने इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी काढून घरातील बेडरुममध्ये चार्जिंगला  ठेवली होती. प्रकाश आणि त्यांची पत्नी कृष्णवेणी बेडरूममध्ये झोपले होते, तर त्यांचे आई-वडील रामास्वामी आणि कमलम्मा त्यांचा नातू कल्याणसोबत हॉलमध्ये झोपले होते, जिथे बॅटरी चार्ज होत होती. रात्री 12.30 वाजता प्रकाश यांनी बॅटरी चार्ज करण्यासाठी लावली आणि पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास तिचा स्फोट झाला. स्फोटानंतर संपूर्ण हॉलला आग लागली. या घटनेत रामास्वामी, कमलम्मा आणि कल्याण भाजले पैकी रामास्वामी यांचा मृत्यू झाला आहे.

निझामाबाद III टाऊन पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक साईनाथ यांनी सांगितले की, प्रकाश आणि कृष्णवेणी यांनी आग विझवण्याच्या प्रयत्न केला यावेळी त्यांना किरकोळ दुखापत झाली. तर इतर जखमींना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. रामास्वामी यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी हैदराबादला नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत, प्रकाशने आरोप केला आहे की ईव्ही बॅटरी उत्पादकाने योग्य मानकांचे पालन केले नाही म्हणूनच हा अपघात झाला.

बी. प्रकाश यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे कि "इलेक्ट्रिक वाहनाच्या बॅटरीची निर्मिती करताना मानकांचे पालन केले गेले नाही आणि यामुळे आमच्या कुटुंबाचे नुकसान झाले आहे. या प्रकरणात दोषी असणाऱ्या कंपनीवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

दरम्यान, देशभरात इलेक्ट्रिक वाहनांचा पेट्रोलच्या वाढत्या किमतींमुळे खप वाढत असतानाच या वाहनांच्या बॅटरीचे स्फोट होण्याच्या अनेक घटनाही समोर आल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच पुण्यात ओला इलेक्ट्रिक स्कुटरला आग लागल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल झाला होता. २६ मार्च रोजी तामिळनाडूतील वेल्लोरमध्ये चार्जिंगला लावलेल्या इलेक्ट्रिक स्कूटरचा स्फोट झाला होता. या घटनेत एक व्यक्ती आणि त्याची मुलगी ठार झाली होती.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply