वाशीम : आर्थिक घोटाळ्यातील तीन आरोपी जेरबंद

वाशीम : रिसोड येथील महिला उत्कर्ष प्रतिष्ठानमधील अठरा कोटीहून अधिक रकमेच्या अफरातफर प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने येवता शिवारातून २२ मार्च रोजी आणखी तीघांना अटक केली आहे. उद्धव हेलसकर, संतोष हेलसकर आणि धनंजय हलगे अशी अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत. यापूर्वी पोलीसांनी आरोपी उपेंद्र मुळे यास अटक केली असून अटकेतील आरोपींची संख्या आता चार झाली आहे. सदर प्रकरणातील तेरा आरोपी अद्यापही फरार असून पोलिस त्यांच्या मागावर आहेत.

खासदार भावना गवळी अध्यक्ष असलेल्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठानमध्ये १८ कोटीहून अधिक रकमेची अफरातफर झाली होती. या संदर्भात खासदार भावना गवळी यांच्या तक्रारीवरून रिसोड पोलिस ठाण्यामध्ये १२ मे २०२० रोजी महिला उत्कर्ष प्रतिष्ठानचे संचालक भारत ज्ञानदेव देवगीरे, माजी सचिव अशोक नारायण गांडोळे, उपाध्यक्षा वर्षा अशोक हेळसकर, सह सचिव गणेश बालाजी ढोले, डी - फार्म महाविद्यालयाचे कार्यालय अधिक्षक विनोद पंधरे, आयुर्वेद महाविद्यालयाचे लेखापाल संतोष सोमाणी, अरुणा हालगे, शकुंतला कासार, महेश देवगिरे, हरिभाऊ देवगिरे, मधुकर हेळसकर , उद्धव गांडोळे, समाधान हेळसकर, संतोष हेळसकर, उपेंद्र मुळे, दिनेश दोरसेटवार व धनंजय मनोहर हालगे या सतरा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, या अफरातफरीचा दाखल गुन्हा रद्द करावा म्हणून संबंधित आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे अर्ज केला होता. मात्र, आरोपींनी दाखल केलेला अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळला, तसेच हा गुन्हा दखलपात्र असल्यामुळे या प्रकरणात पोलिसांना तपासाची संधी देणे आवश्यक असल्याचे मत न्यायालयाने नोंदवीले होते. दरम्यान, जिल्हा पोलिस अधिक्षक बच्चन सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी तथा तपास अधिकारी यशवंत केडगे यांनी तपासाला गती देत यातील पहिला आरोपी उपेंद्र मुळे यास १६ मार्च रोजी अटक केली. दरम्यान गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे येवता परिसरातील शेतवाडीमध्ये लपून बसलेल्या उद्धव हेलसकर, संतोष हेलसकर आणि धनंजय हलगे यांना अटक केली. यामधील संतोष हेलसकर व धनंजय हलगे यांना न्यायालयाने २८ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. सदर प्रकरणातील उर्वरीत तेरा आरोपी फरार असून पोलिसांची पथके त्यांच्या मागावर असल्याची माहिती सुत्रांनी दिली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply