युक्रेनची जागा भारतीय ‘नॉन जीएम’ मक्याने घेतली

नाशिक : रशियाच्या हल्ल्यात युक्रेन एकीकडे बेचिराख होत असताना, जगामध्ये जनुक सुधारित नसलेल्या (नॉन जीएम) वाणाच्या मक्याच्या निर्यातीचा गंभीर प्रश्‍न उभा ठाकला आहे. त्यामुळे आता स्वाभाविकपणे जागतिक बाजारपेठेची सारी नजर जनुक सुधारित नसलेल्या भारतीय मक्यावर केंद्रित झाली आहे. बांगलादेश, व्हिएतनाम, इंडोनेशियामध्ये मक्याची निर्यात सध्या जोरात सुरू आहे. परिणामी, मक्याच्या निर्यातीचा भाव क्विंटलला २०० ते २५० डॉलरवरून ३४५ डॉलरपर्यंत पोचला आहे. युक्रेनचा जागतिक बाजारपेठेतील मक्याचा हिस्सा १७ टक्क्यांपर्यंत आहे. युक्रेन हा नॉन जीएम मक्याचा उत्पादक आणि निर्यातदार आहे. याखेरीज जागतिक बाजारपेठेमध्ये युक्रेनच्या मक्याचा सर्वांत कमी भाव असतो. त्यामुळे युक्रेनच्या भावामध्ये भारतीय मक्याची निर्यात होते. युद्धाचा भडका उडण्याअगोदर मक्याचा जागतिक बाजारपेठेतील भाव टनाला २१ हजार रुपयांपर्यंत होता. आता हाच भाव टनाला २६ हजार रुपयांपर्यंत झेपावला आहे. भारतीय मक्याचे भाव वाढले असले, तरीही आयातदारांकडून मक्याची मागणी कायम आहे. याखेरीज पशुखाद्य वापरण्यात येणाऱ्या खाद्यतेलाच्या भावात वाढ झाली आहे. कोंबड्यांच्या खाद्याचे भाव २५ टक्क्यांनी वाढले कुक्कुटपालन उद्योगामधील खाद्यात मक्याचा उपयोग ६५ टक्के केला जातो. युक्रेन-रशिया युद्धामुळे खाद्यासाठीच्या मक्याचा भाव २५ टक्क्यांनी वाढला आहे. कोंबड्यांच्या खाद्यासाठी दोन हजार रुपये क्विंटल भावाने मका विकत मिळायचा. आता त्यास दोन हजार ४०० रुपये द्यावे लागतात. त्याच वेळी खाद्यात वापरल्या जाणाऱ्या तेलाचा भाव किलोला ११५ वरून १३३ रुपयांपर्यंत पोचला आहे. याशिवाय महिन्यापूर्वी सोयामिलचा टनाचा भाव ५५ हजार रुपये होता. तो आता ६५ हजार रुपयांपर्यंत पोचला आहे. परिणामी, कुक्कुटपालन उद्योगासाठीच्या खाद्याच्या भावात २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. दरम्यान, उद्योगांमधून मिळालेल्या माहितीनुसार देशातून जानेवारी २०२२ मध्ये पाच लाख टन, तर गेल्या महिन्यात साडेतीन लाख टन मक्याची निर्यात झाली. युक्रेन-रशिया युद्धाअगोदर मका स्वस्त असल्याने निर्यात वाढली होती. आता मागणीएवढा मका मिळत नसल्याने भारतीय मका भाव खाऊ लागला आहे. 'कोंबड्यांचे खाद्य आणि चिकनच्या भावाचा उच्चांक झाला आहे. मका, सोयामिल आणि खाद्यासाठीच्या तेलाच्या किमती वाढल्याने ब्रॉयलर कोंबड्यांच्या उत्पादनाचा खर्च वाढला आहे. यापूर्वी ८५ रुपये किलो भावाने ब्रॉयलर कोंबड्यांचे उत्पादन व्हायचे. आता हा खर्च १०५ रुपये असा झाला आहे. कोंबड्यांची किंमत वाढल्याने १८० ते २०० रुपये किलो भावाने मिळणारे चिकन आता ग्राहकांना २५० ते ३०० रुपये किलो भावाने विकत घ्यावे लागते.'' -उद्धव आहेर (आनंद ॲग्रो समूह)


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply