‘या’ देवस्थानाने सांगितला कोहिनूर हिऱ्यावर हक्क; राष्ट्रपतीकडे हिरा परत आणण्यासाठी मध्यस्थी करण्याची मागणी, पत्रात पंतप्रधानांचाही उल्लेख

ओडिशामधील एका संस्थेनं कोहिनूर हिऱ्यावर दावा केला आहे. भगवान जग्गनाथाची मालकी कोहिनूर हिऱ्यावर आहे असं या संस्थेचं म्हणणं आहे. श्री जग्गनाथ सेनेनं हा दावा केला असून ही संस्था ओडिशामधील पूरी येथे आहे. यासंदर्भात संस्थेनं राष्ट्रपती द्रौपदी मूर्म यांना पत्र लिहिलं असून त्यांनी मध्यस्थी करुन ब्रिटनच्या सरकारकडून कोहिनूर हिरा पुन्हा जग्गनाथ मंदिरामध्ये आणण्यासाठी मदत करावी अशी मागणी करण्यात आली आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार १०५ कॅरेटचा हा हिरा आता किंग चार्ल्स तिसरे यांच्या पत्नीला सुपूर्द केला जाणार आहे. मागील आठवड्यामध्ये ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ दुसऱ्या यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्याकडील हा हिरा आता त्यांच्या सूनबाई कॅमिला यांच्याकडे दिला जाणार आहे.

राष्ट्रपतींना पाठवलेल्या पत्रात काय म्हटलंय?
“कोहिनूर हिऱ्याचे मालक श्री जग्गनाथ भगवान आहेत. तो हिरा सध्या इंग्लंडच्या महाराणीकडे आहे. आपल्या पंतप्रधानांना यासंदर्भातील पावले उचलण्याची विनंती करुन तो भगवान जग्गनाथांसाठी पुन्हा भारतात आणावा. महाराज रणजीत सिंग यांनी आपल्या वारसपत्रामध्ये हा हिरा जग्गनाथ देवस्थानाला दान केला होता,” असं श्री जग्गनाथ सेनेनं राष्ट्रपती मूर्म यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

निधनानंतर १० वर्षांनी ब्रिटीशांनी ताब्यात घेतला हिरा
श्री जग्गनाथ सेनेचे संयोजक प्रिय दर्शन पटनाईक यांनी केलेल्या दाव्यानुसार पंजाबचे महाराज रणजीत सिंग यांनी हा हिरा भगवान जग्गनाथाला दान केला होता. मात्र महाराज रणजीत सिंग यांचं १८३९ मध्ये निधन झाल्याने हा हिरा देवस्थानच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. हाच हिरा महाराजांच्या मृत्यूनंतर १८४९ साली ब्रिटीशांनी रणजीत सिंग यांचे पुत्र दुलीप सिंग यांच्याकडून बळजबरीने ताब्यात घेतल्याचा दावा श्री जग्गनाथ सेनेनं केला आहे.

राजघराण्याने त्या पत्राला दिलं उत्तर
“त्यांना हा हिरा पुरी येथील जग्गनाथ देवस्थानाकडे दिला जाणार असल्याची कल्पना होती,” असंही पटनाईक यांनी पीटीआयशी बोलताना म्हटलं आहे. यासंदर्भातील एक पत्र पटनाईक यांनी ब्रिटनच्या महाराणीलाही लिहिलं होतं. २०१६ साली ऑक्टोबर महिन्यामध्ये ब्रिटीश राजघराण्याचं वास्तव्य असणाऱ्या बर्किंगहम पॅलेसमधून आलेल्या उत्तरामध्ये यासंदर्भात ब्रिटीश सरकारशी पत्रव्यवहार करावा असं पटनाईक यांना सांगण्यात आलं होतं. सध्या भारताच्या राष्ट्रपतींकडे करण्यात आलेल्या नव्या मागणीमध्ये बर्किंगहम पॅलेसकडून आलेल्या पत्राच्या उत्तराची एक प्रतही जोडण्यात आली आहे.

…म्हणून सहा वर्ष काहीच केलं नाही
२०१६ ला पत्र मिळाल्यानंतर सहा वर्ष तुम्ही काहीही कारवाई किंवा मागणी का केली नाही असं विचारलं असताना पटनाईक यांनी आपल्याला ब्रिटनला जाण्यासंदर्भातील व्हिसा नाकारण्यात आल्याचं कारण सांगितलं.

कोहिनूर हिऱ्याबाबत भारत सरकारची भूमिका
कोहिनूर हिरा चोरून किंवा जबरदस्तीने घेतला नव्हता, त्यामुळे भारताने पुन्हा त्यावर आपला हक्क सांगण्याचा प्रयत्न करू नये, असं भारत सरकारने यापूर्वी सर्वोच्च न्यायालयात म्हटलं आहे. तसेच ब्रिटीश सरकारनेही यापूर्वी कोहिनूर हिरा परत करण्याबाबतची शक्यता नाकारली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply