मुंबई – अंगाडीया खंडणी प्रकरण: 3 पोलीस अधिकाऱ्यांविरोधात किल्ला कोर्टात आरोपपत्र दाखल

मुंबई - अंगाडीया खंडणी वसुली प्रकरणात अटकेत असलेल्या तीन पोलीस अधिकाऱ्यांविरोधात किल्ला कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. जवळपास एक हजार पेक्षा अधिक पानांचे आरोपपत्र असून त्यात 70 जणांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत.

याप्रकरणी आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली असून निलंबित पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठीही (Saurabh Tripathi) याप्रकरणात आरोपी आहेत. त्रिपाठी यांनी कोणतीही कारवाई न करण्यासाठी १० लाख रुपये प्रतिमहिना मागितल्याची तक्रार अंगडिया व्यावसायिकांच्या संघटनेने केली होती.

त्रिपाठी यांच्या सूचनेवरून लोकमान्य टिळक (एल.टी.) मार्ग पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक नितीन कदम व उपनिरीक्षक समाधान जमदाडे व पोलीस निरीक्षक (गुन्हे) ओम वंगाटे यांनी अंगडिया व्यवसायिकांना डांबून ठेऊन त्यांच्याकडून खंडणी उकळल्याचा आरोप आहे.

शनिवारी गुन्हे शाखेने पोलीस निरीक्षक ओम वंगाटे,सहायक पोलीस निरीक्षक नितीन कदम व उपनिरीक्षक समाधान जमदाडे यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले. या आरोपपत्रात ७० साक्षीदारांच्या जबाबांचा सहभाग आहे. याशिवाय प्रकरणातील अंगडिया व्यावसायिकांचे जबाब महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर नोंदवण्यात आले आहेत.

डीसीपी सौरभ त्रिपाठी हे 2010 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्रिपाठी यांनी अहमदनगरचे पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहिलेलं आहे. तिथे अण्णा हजारे यांच्या आंदोलनावेळी त्यांनी बंदोबस्तासाठी चांगलं काम केलेले होतं. त्यानंतर मुंबईत परिमंडळ 4 चे पोलीस उपायुक्त म्हणून त्यांची नेमणूक झाली.

त्रिपाठी यांनी प्रोटेक्शन सिक्युरिटी विभागात डीसीपी म्हणून काम पाहिलं आहे. त्यांची नियुक्ती परिमंडळ 2 मध्ये पोलीस उपायुक्त म्हणून करण्यात आली होती जिथे त्यांच्यावर खंडणीचे आरोप झाले. आरोपानंतर त्यांची बदली डीसीपी ऑपरेशन या ठिकाणी करण्यात आली पण त्यांनी अद्याप चार्ज घेतला नाही. दरम्यान त्रिपाठी यांना पहिले आरोपी म्हणून घोषित करण्यात आलंय आणि गृहविभागाला निलंबनाचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.

गेल्या वर्षी 7 डिसेंबर रोजी अंगडिया असोसिएशनने मुंबईतील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याकडे तक्रार केली होती. डीसीपी सौरभ त्रिपाठी यांनी अंगडियांना त्यांचा व्यवसाय चालवण्यासाठी दरमहा 10 लाख रुपयाची लाच देण्याची मागणी केली होती असे आरोप करण्यात आले होते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply