“मंत्रीमंडळात कुणाला स्थान मिळणार हे कोणी सांगू शकत नाही, कारण देवेंद्र फडवणीस…”; हरिभाऊ बागडेंचं वक्तव्य

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी झाल्यापासून शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारावर तर्कवितर्क लावले जात आहेत. विरोधकांकडून सरकार कोसळणार असल्यानेच मंत्रीमंडळ विस्तार होत नसल्याचा आरोप होतोय. दुसरीकडे भाजपाा व बंडखोर शिंदे गटातील अनेक नेत्यांना आपल्याला मंत्रीपद मिळणार की नाही याची चिंता लागलेली दिसत आहे. यावर आता भाजपा आमदार हरिभाऊ बागडे यांनी प्रतिक्रिया दिली. ते औरंगाबादमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.

हरिभाऊ बागडे यांनी म्हणाले, “नव्या सरकारच्या मंत्रीमंडळात कुणाला संधी मिळणार हे कुणालाच सांगता येणार नाही. ते फक्त देवेंद्र फडणवीसच सांगू शकतील. त्यामुळे त्यांनाच विचारायला हवं. प्रत्येकजण मंत्रीपदासाठी इच्छूक आहे. कोण फार उत्सूक आहे असं मी नाव सांगणार नाही. ज्याची त्याची इच्छा असते. मात्र, एक गोष्ट निश्चित केली पाहिजे. ती गोष्ट आमच्या सर्व आमदारांना माहिती आहे.”

“आपण पक्षापेक्षा मोठे नाही ही भूमिका आमच्या मनात कायम”

“पक्षाने संधी दिली तर काम करायचं, संधी दिली नाही तर आपलं पक्षाचं काम करत राहायचं. आपण पक्षापेक्षा मोठे नाही ही भूमिका आमच्या मनात कायम आहे,” असंही हरिभाऊ बागडे यांनी नमूद केलं.

राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असून यासाठी भाजपाचे अनेक आमदार इच्छुक असल्याचे चित्र मराठवाड्यात दिसत आहे. त्यामुळे आता कुणाची वर्णी लागेल याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. अशातच पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर आमदार हरिभाऊ बागडे यांनी इच्छुकांना सूचक इशारा दिलाय. तसेच पद मिळाल्यास काम करायचं, नाही मिळालं तर पक्षाचं काम करत राहायचं असं म्हटलं आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply