पुणे : १० लाखांची खंडणीप्रकरणी नगरसेवकाचा अटकपूर्व जामीन फेटाळला

पुणे : वर्गणी स्वरूपात पैसे घेऊन ते सामाजिक कामात न वापरता १० लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी नगरसेवकाचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. सत्र न्यायाधीश जी. पी. अगरवाल यांनी हा आदेश दिला.संजय गुलाब घुले (रा. महंमदवाडी) असे या नगरसेवकाचे नाव आहे. या प्रकरणी बांधकाम व्यावसायिक अनुज उमेश गोयल (वय ३९, रा. बंड गार्डन रस्ता) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार घुले यांच्यासह १० पेक्षा जास्त आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातील तिघांना अटक करण्यात आली असून सध्या ते जामीनावर आहेत.

घुले यांनी त्यांच्या अविभक्त मालकीची जमीन फिर्यादी यांच्या श्री बालाजी रियालटी या बांधकाम व्यवसाय संस्थेस विकली होती. जमिनीचा मोबदला मिळालेला असताना घुले यांनी उत्सव, मंदिर बांधकाम अशा विविध कारणांनी दर सहा महिन्यांनी फिर्यादी यांच्याकडे वर्गणी मागितली. वर्गणीची रक्कम सामाजिक कामांसाठी न वापरता वैयक्तिक कामात वापरले. त्यानंतर घुले यांनी फिर्यादी यांच्याकडे फेब्रुवारीमध्ये १० लाखांची खंडणी मागितली.

खंडणी न दिल्याने त्यांच्या हस्तकांनी फिर्यादी यांच्या जागेत प्रवेश करून फिर्यादी यांच्या प्रकल्पावरील सुरक्षारक्षक व बांधकाम विकसकाला दमदाटी आणि शिवीगाळ केली, अशी फिर्याद देण्यात आली आहे. या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी घुले यांनी अर्ज केला होता. त्यास सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी विरोध केला. या गुन्ह्याच्या सखोल तपासासाठी जामीन अर्ज फेटाळण्यात यावा, असा युक्तिवाद ॲड. बोंबटकर यांनी केला.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply