पुणे : राज्यसभा निवडणुकीतील उलथापालथ,अजित पवारांचा पिंपरी-चिंचवड दौरा रद्द

पुणे : राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने मुंबईत रंगलेले राजकीय नाट्य आणि मजमोजणीला झालेल्या विलंबामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शनिवारी (११ जून) होणारा पिंपरी-चिंचवड दौरा रद्द करावा लागला. सकाळी सहा वाजताच सुरू होणाऱ्या या दौऱ्यात पालिकेच्या अनेक प्रकल्पांचे उद्घाटन पवारांच्या हस्ते होणार होते. दौरा रद्द झाल्याने पालिकेच्या तयारीवर पाणी पडले. तर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे.

आगामी पालिका निवडणुकांच्या तयारीचा भाग म्हणून अजित पवारांचा शनिवारी शहर दौरा होणार होता. त्यानिमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमांसाठी महापालिका तसेच राष्ट्रवादी काँग्रेसकडून जय्यत तयारी सुरू सुरू होती. मात्र, मुंबईत राज्यसभा निवडणुकीचे नाट्य रंगत गेले. मतमोजणीची प्रक्रिया मध्यरात्रीनंतरही खोळंबली. अशा वातावरणात पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी मुंबईतच थांबावे, अशा सूचना महाविकास आघाडीतील नेत्यांना देण्यात आल्या होत्या.
अजित पवारांचा दौरा सकाळी सहा वाजताच सुरू होणार होता. त्याआधी १५ मिनिटे ते शहरात पोहोचणार होते. मात्र, राज्यसभा निवडणुकीमुळे निर्माण झालेल्या एकूण परिस्थितीमुळे शनिवारी होणारा पिंपरी-चिंचवडचा दौरा पवारांना रद्द करावा लागला. त्यामुळे महापालिकेने केलेली तयारी व्यर्थ गेलीच, पवारांचा दौरा रद्द झाल्याने ज्यांच्या भागात कार्यक्रम होणार होते, त्यांचा हिरमोड झाला.
बोपखेल येथील नियोजित पुलाच्या कामाची, मोरवाडीतील लाल घोडा शिल्पाचे उद्घाटन, पालिका मुख्यालयात विविध कामांचे सादरीकरण, सायन्स पार्कशेजारील तारांगण प्रकल्पाचे उद्घाटन, भोसरी लांडेवाडीतील समाज मंदिराचे लोकार्पण, आळंदी रस्त्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडाविहाराचे भूमिपूजन, पिंपळे सौदागर येथील शिवछत्रपती क्रीडासंकुल तसेच शिल्पाचे उद्घाटन, वाकडला चित्ता शिल्पाचे उद्घाटन, पिंपळे निलखला हत्ती शिल्पाचे उद्घाटन, थेरगाव रुग्णालयाची पाहणी व सादरीकरण असे विविध कार्यक्रम अजित पवारांच्या दौऱ्यात होणार होते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply