पुणे :भूमी अभिलेख कार्यालयातील लाचखोर लिपिकाला पकडले

पुणे : जमीन मोजणी केल्यानंतर हद्द कायम ठेवण्यासाठी एकाकडून वीस हजारांची लाच घेणाऱ्या इंदापूरमधील भूमी अभिलेख कार्यालयातील लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले.या प्रकरणी राजाराम दत्तात्रय शिंदे (वय ५४) यांच्या विरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.

तक्रारदाराच्या काकांची इंदापूरमधील निंबोडी गावात जमीन आहे. तेथील जमिनीची दोन महिन्यांपूर्वी मोजणी करण्यात आली होती. हद्द कायम ठेवण्यासाठी इंदापूरमधील भूमी अभिलेख उपअधीक्षक कार्यालयातील लिपिक राजाराम शिंदे यांनी तक्रारदाराकडे पंचवीस हजारांची लाच मागितली होती.

तक्रारदाराने तडजोडीत वीस हजारांची लाच देण्याचे मान्य करुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. तक्रारीची शहानिशा करुन इंदापूरमधील भूमी अभिलेख कार्यालयात सापळा लावण्यात आला. तक्रारदाराकडून वीस हजारांची लाच घेताना शिंदे यांना पकडण्यात आले. पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अतिरिक्त अधीक्षक सूरज बनसोडे, सहायक आयुक्त श्रीहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक संदीप कऱ्हाडे तपास करत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply