पुणे : 'भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने देवेंद्र फडणवीसांचा अपमान केला'; काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याची टीका

पुणे : 'देवेंद्र फडणवीस यांच्या परिस्थितीवर मला दया येत आहे. जो व्यक्ती एकेकाळी मुख्यमंत्री होता. त्या व्यक्तीला आज दुसऱ्या व्यक्तीच्या हाताखाली उपमुख्यमंत्री म्हणून काम करावं लागत आहे. फडणवीस यांना कुणी उपमुख्यमंत्री केलं हा संशोधनाचा विषय आहे. मात्र, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून देवेंद्र फडणवीस यांचा अपमान केला आहे. त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत आहे, असे वक्तव्य काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी केलं.

काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह हे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर असताना दिग्विजय सिंह यांनी महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडीवर भाष्य केलं. तसेच भाजपवर जोरदार निशाणा साधला. यावेळी शिंदे सरकारवरही जोरदार टीका केली. ' एकनाथ शिंदे यांच्याकडे कमी संख्या असताना मुख्यमंत्री केलं. कमी संख्या असलेल्या मुख्यमंत्र्यांची सत्ता जास्त दिवस चालत नाही, असा आमचा अनुभव आहे', असे दिग्विजय सिंह म्हणाले.

'लोकशाही विकत घेतली जात आहे. महराष्ट्रात जे झालं हे काही नवं नाही. निवडून आलेल्यांकडून लोकशाही विकत घेतली जात आहे. भाजपचा लोकशाही आणि भारतीय संविधानावर विश्वास राहिला नाही. पक्षांतर बंदी कायदा पायदळी तुडवला जात आहे. बहुमत विकत घेतलं जात आहे, असेही दिग्विजय सिंह म्हणाले.

दिग्विजय सिंह पुढे म्हणाले, 'गुरू गोवळकर यांनी भारतीय तिरंग्याला अपवित्र म्हणून विरोध केला होता. मात्र, आता भाजप भारतीय तिरंगच बदलत आहे. तिरंगा हा खादी कापड, कापूस, सुतापासून बनवायला हवा. मात्र, आता तिरंगा हा चीनमधून आणलेल्या पॉलिस्टर कापडापासून बनवला जात आहे'.

'गोव्यात काँग्रेसचे आमदार भाजपच्या गटात चालले आहेत, त्यांच्यापैकी किती आमदारांवर ईडी केस आहे हे तुम्ही पहा. भाजपकडून लोकशाही विकत घेतली जात आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोडली तर मुख्यमंत्री झाले, मध्य प्रदेशमध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस सोडली, पण ते उपमुख्यमंत्री देखील झाले नाही', असे दिग्विजय सिंह पुढे म्हणाले.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply