पुणे : दिवाळीसाठी पुण्यातून सर्वाधिक नागरिक विदर्भ, उत्तर भारतात रवाना; रेल्वे, एसटीच्या जादा गाड्यांना मोठा प्रतिसाद

पुणे : दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी पुणे शहर आणि परिसरातून महाराष्ट्रातील मूळ गावी जाणाऱ्यांमध्ये सर्वाधिक नागरिक विदर्भातील आहेत. त्याचप्रमाणे देशाच्या विविध भागांत जाणाऱ्या नागरिकांमध्ये उत्तर भारतात जाणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. यंदा रेल्वे आणि एसटीकडून प्रवाशांची मागणी लक्षात घेता सोडण्यात आलेल्या जादा गाड्यांची स्थिती पाहता पुण्यातून मूळ गावी जाणाऱ्या नागरिकांची संख्या स्पष्ट होत आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले नागरिक कामानिमित्त स्थायिक झाले आहेत. त्याचप्रमाणे देशाच्या विविध भागातील नागरिकही पुणे शहर आणि परिसरात मोठ्या संख्येने आहेत. दरवर्षी दिवाळीच्या सणासाठी यातील बहुतांश नागरिक मूळ गावी जात असतात. गेल्या दोन वर्षांत करोना संसर्गाची स्थिती आणि निर्बंध असताना हे प्रमाण काहीसे कमी होते. मात्र, यंदा पुन्हा पूर्वीप्रमाणे दिवाळीसाठी मूळ गावी जाणाऱ्यांची संख्या वाढल्याचे दिसून आले. प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन रेल्वेकडून राज्यात आणि देशाच्या विविध भागांमध्ये जादा गाड्या सोडण्यात आल्या. एसटीकडूनही राज्याच्या विविध भागांमध्ये जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे खासगी वाहतूकदारांनीही पुण्यातून यंदा मोठ्या प्रमाणावर गाड्या सोडल्या आहेत.

हेही वाचा- ‘तुम्ही न्यायालयात केस बांधत जाऊ नका’, पुण्यातील महिला वकिलांना नोटीस? नव्या वादाला तोंड

पुण्यातून देशाच्या विविध भागात जाणाऱ्यांमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्तरेकडील बिहार, उत्तर प्रदेश आदी राज्यांमध्ये जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. मध्य प्रदेशात जाणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. त्याचप्रमाणे राजस्थान, हैदराबाद आणि गुजरात या भागांत जाण्यासाठीही प्रवाशांची मागणी चांगली असल्याचे दिसून आले. त्यानुसार प्रामुख्याने उत्तर भारतातील राज्यांसाठी रेल्वेकडून पुण्यातून जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले होते. नेहमीच्या गाड्यांसह बिहार, उत्तर प्रदेश आदी भागांत सोडण्यात आलेल्या जादा गाड्यांना गेल्या आठवड्यापासून मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले. सध्याही या भागातील गाड्या भरभरून जात आहेत. दानापूर, पटना या गाड्यांना सर्वाधिक गर्दी दिसून आली. गर्दीचे नियोजन करण्यासाठी वेगळी व्यवस्था उभारण्यात आली आहे. फलाटावर अतिरिक्त गर्दी रोखण्यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत पुणे स्थानकावरील फलाटाच्या तिकीट दरामध्ये २० रुपायंनी वाढ करून ते ३० रुपये करण्यात आले आहे.

एसटीच्यावतीनेही गेल्या आठवड्यापासून जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले होते. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मैदानावर त्यासाठी तात्पुरते स्थानकाचेही नियोजन करण्यात आले होते. या भागातून प्रामुख्याने विदर्भात गाड्या सोडण्यात आल्या. एसटी आणि खासगी वाहतूकदारांच्या प्रामुख्याने विदर्भात जाणाऱ्या गाड्यांना यंदाही मोठा प्रतिसाद मिळाला. पुणे-नागपूर गाडीसाठी प्रवाशांची सर्वाधिक मागणी होती. अमरावती, अकोला या भागांतील गाड्याही भरभरून गेल्या. विदर्भानंतर सर्वाधिक प्रवाशांची मागणी मराठवाड्यात जाण्यासाठी होती. नांदेड, परभणी, उस्मानाबाद आदी गाड्यांनाही प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

रेल्वेकडून आज, उद्याही जादा गाड्या

प्रवाशांची मागणी आणि आरक्षणाची स्थिती लक्षात घेऊन रेल्वेकडून जादा गाड्या सोडण्यात येत आहेत. २४ ऑक्टोबरलाही पुण्यातून रेल्वेच्या जादा गाड्या धावणार आहेत. हडपसर स्थानकातून २६ ऑक्टोबरला नांदेडसाठी दुपारी ३.१० वाजता सोडण्यात येणार आहे. नांदेडहून २५ ऑक्टोबरला हडपसरसाठी संध्याकाळी ५.४० वाजता गाडी सुटेल. पुणे-दानापूर हा सर्वाधिक मागणी असणाऱ्या मार्गांपैकी एक आहे. या मार्गावर पुणे-दानापूर विशेष रेल्वे २५ आणि २६ ऑक्टोबरला रात्री १२.१० वाजता पुण्यातून सोडण्यात येईल. दानापूरहून पुण्यासाठी २७ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता विशेष गाडी असणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply