पुणे : दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; २७ जुलै ते १२ ऑगस्ट दरम्यान दहावी, तर २१ जुलै ते १२ ऑगस्ट दरम्यान बारावीच्या विद्यार्थ्यांना संधी

पुणे : राज्य मंडळाने मार्च-एप्रिलमध्ये घेतलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुन्हा एक संधी देण्यासाठी पुरवणी परीक्षा घेतली जाणार आहे. त्यानुसार दहावीची परीक्षा २७ जुलै ते १२ ऑगस्ट, तर बारावीची परीक्षा २१ जुलै ते १२ ऑगस्ट या कालावधीत होईल. राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी ही माहिती दिली.

अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षा आणि श्रेणी सुधारू इच्छिणाऱ्या श्रेणी सुधार परीक्षा घेतली जाते. बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर राज्य मंडळाने पुरवणी आणि श्रेणी सुधार परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया १० जूनपासून सुरू केली आहे. तर  दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया २० जूनपासून सुरू करण्यात येणार आहे. राज्य मंडळाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार बारावीची सर्वसाधारण आणि द्विलक्ष्यी विषयांची पुरवणी परीक्षा २१ जुलै ते १२ ऑगस्ट, बारावीची व्यवसाय अभ्यासक्रमाची परीक्षा २१ जुलै ते ८ ऑगस्ट आणि दहावीची पुरवणी परीक्षा २७ जुलै ते १२ ऑगस्ट या कालावधीत होईल. बारावीची प्रात्यक्षिक, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा २० जुलै ते ८ ऑगस्ट, तर दहावीची प्रात्यक्षित, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा २६ जुलै ते ८ ऑगस्ट या दरम्यान होणार आहे.

ऑनलाइन समुपदेशन सेवा राज्य मंडळाने दहावीच्या परीक्षेवेळी विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यासाठी ऑनलाइन समुपदेशन सेवा सुरू केली होती. मात्र निकालानंतर दडपणाखाली असलेल्या विद्यार्थ्यांच्या समुपदेशनासाठी ऑनलाइन  सेवा सुरू ठेवली जाणार आहे. ही सेवा आठ दिवस सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत देण्यात येईल. समुपदेशकांचे भ्रमणध्वनी क्रमांक मंडळाच्या संकेतस्थळावर  देण्यात आल्याचे राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी सांगितले.

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply