पुणे : केवळ राजकारणासाठी वातावरण दूषित करू नये – पवारांचा विरोधकांवर निशाणा!

पुणे : राष्ट्रवादी काँग्रसेचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्यात आयोजित एका जाहीर कार्यक्रमात बोलाताना विरोधकांकडून होणाऱ्या टीका, टिप्पणीला प्रत्युत्तर दिलं आहे. “आज भारतामध्ये चुकीचे विचार पसरवले जात आहेत. त्यांनी लगतच्या देशांची परिस्थिती पहावी. केवळ राजकारणासाठी वातावरण दूषित करू नये.” असं शरद पवारांनी बोलून दाखवलं. पुण्यात कोंढवा भागातील सर्व धर्मीय ईद मिलन कार्यक्रमात ते बोलत होते .

कार्यक्रमातील भाषणात बोलताना शरद पवार म्हणाले, “हा देश अनेक जाती-धर्माने बनला आहे. यात विविधता आहे, ती उठून दिसायची असेल, तर या देशात जी फुलं उमलली आहेत त्या सर्व फुलांचा सन्मान करायला हवा. आज देशात जी वेगळी स्थिती निर्माण झाली आहे. जगात तर चमत्कारी परिस्थिती निर्माण झालेली आहे. रशिया छोट्याशा युक्रेनवर हल्ला करतोय, हजारोंचे प्राण घेतले जाताय, मानवतेचे दर्शन संपल्याच दिसत आहे. आपल्या शेजारच्या श्रीलंकेत सामान्य माणूस रस्त्यावर उतरला आहे, संघर्ष करतोय अन् राज्यकर्ते अंडरग्राउंड झाले आहेत. त्यांच्यावर तोंड लपवायची वेळ आली आहे. पाकिस्तान जिथं तुमचे माझे भाऊबंद देखील आहेत, तिथे एक तरुण पंतप्रधान होतो पण त्याला त्या पदावरून पायउतार व्हावं लागलं हे का घडतंय? कारण त्या ठिकाणचे राज्यकर्ते आणि त्यांच्या भूमिकेमुळं अशी परिस्थिती उद्भवलेली आहे.”

तसेच, “आज भारतामध्ये चुकीचे विचार पसरवले जात आहेत. त्यांनी लगतच्या देशाची परिस्थिती पहावी. केवळ राजकारणासाठी वातावरण दूषित करू नये. आज जर कोणी देशाच्या अभिमानाला धक्का लावण्याचा प्रयत्न करत असेल, पिढ्यांपिढ्या एकत्र राहण्याला तोडत असेल, तर आपल्याला एकजुटीने याच्या विरोधात उभे रहावे लागेल. यांना धडा शिकवावे लागेल.” अस म्हणत शरद पवारांनी यावेळी विरोधकांवर निशाणा साधला.

याचबरोबर, “आज आपण इथं कशासाठी जमलो? जात-धर्म बाजूला ठेऊन माणुसकी जपायला जमलो. प्रश्न नक्कीच खूप आहेत. महागाई, विकासाचे प्रश्न उभे आहेत. पण देशात जे चित्र उभं झालंय, त्या अनुषंगाने आपल्याला सध्या बंधुभाव जपणे गरजेचे आहेत. मी पक्ष-बिक्ष मानत नाही, आत्ता ही इथं विविध पक्षाचे नेते आहेत. देशहितासाठी आपण सगळे जमलोय. निवडणुकीचा यात कोणताही विचार नाही. पुण्यातून शांती आणि बंधुभावाचा संदेश जाऊद्या. सर्वांना कळू द्या, हा आपला आदर्श सर्वांपर्यंत पोहचू द्या.” असंही यावेळी शरद पवारांनी आवाहन केलं.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply