पुणे : अल्पवयीन मुलीवर ॲसिड हल्ला ; आरोपीस दहा वर्ष सक्तमजुरी

अल्पवयीन मुलीवर ॲसिड फेकणाऱ्या एकास विशेष न्यायाधीश ए. एस. वाघमारे यांनी दहा वर्ष सक्तमजुरी आणि ४५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम पीडीत तरुणीला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

अबुकर अयाज तांबोळी (वय २०, रा. पर्वती दर्शन) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत एका अल्पवयीन मुलीने दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. अल्पवयीन मुलीचा तिचा विवाह झाला आहे. २३ नोव्हेंबर २०२० रोजी ती पर्वती दर्शन परिसरातील माहेरी आली होती. त्या वेळी सार्वजनिक स्वच्छतागृहाजवळ आरोपी अबुकरने अल्पवयीन मुलीला अडवले. मुलीने माझा विवाह झाला असून मला त्रास देऊ नको, असे सांगितले. त्यानंतर त्याने तिच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकले. पसार झालेल्या अबुकरला पोलिसांनी अटक केली.

या खटल्यात विशेष सरकारी वकील ॲड. जावेद खान यांनी तेरा साक्षीदारांची साक्ष नोंदविली. त्या पैकी सात साक्षीदार फितूर झाले. पीडीत मुलगीही फितूर झाली. ॲड. खान यांनी घेतलेल्या उलटतपासणीत तिने सर्व घटनाक्रम सांगितला. या खटल्यात वैद्यकीय तसेच रासायनिक तज्ज्ञांचा अहवाल महत्त्वाचा ठरला. साक्ष तसेच पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीस दहा वर्ष सक्तमजुरी तसेच ४५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

दत्तवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सपताळे यांनी तपास केला. न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस हवालदार किशोर तोंडे, एस. सी. घिसरे आणि पी. सी. खन्ना यांनी सहाय केले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply