पुणे : अधिसभा निवडणुकीसाठीची मोर्चेबांधणी; मतदारयादीसाठी पदवीधरांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. त्यामुळे महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमानुसार पुणे विद्यापीठाचे दहा नोंदणीकृत पदवीधर अधिसभेवर निवडून देण्यासाठी विद्यापीठाच्या नोंदणीकृत पदवीधरांनी नावनोंदणी आणि मतदार यादी तयार करण्यासाठी  १५ जून ते १४ जुलै या कालावधीत विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन विद्यापीठाकडून परिपत्रकाद्वारे करण्यात आले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत अधिसभा निवडणुकीसाठीची मोर्चेबांधणी सुरू होणार असल्याचे दिसून येत आहे. 

विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी या संदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. विद्यापीठाच्या अधिसभेचा कार्यकाळ ऑगस्टअखेर संपुष्टात येत आहे. या अधिकार मंडळावर शिक्षक, प्राचार्य, शिक्षणसंस्था, शिक्षकेतर कर्मचारी, तसेच पदवीधर गटातून दहा उमेदवार निवडून दिले जातात. त्यासाठी विद्यापीठाने नोंदणीकृत पदवीधरांकडून अर्ज मागवले आहेत. त्यात पदवीधर हा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा असावा. पुणे विद्यापीठाची स्थापना होण्यापूर्वी मुंबई विद्यापीठाचे पदवीधर असलेल्या व्यक्तीही नोंदणीकृत पदवीधर म्हणून पात्र राहतील. पदवी प्रमाणपत्र आणि निवासाचा पुरावा आवश्यक राहील, असे नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा नोंदणीकृत पदवीधर म्हणून नव्याने नाव नोंदवायचे असल्यास विद्यापीठाच्या election.unipune.ac.in या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. या पूर्वीच नोंदणी केलेल्या पदवीधरांनी मतदार यादीत नावाचा समावेश करण्यासाठी या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अर्ज करताना पदवी प्रमाणपत्र, निवासाचा पुरावा, नाव बदलले असल्यास शासकीय राजपत्राची अथवा विवाह नोंदणी प्रमाणपत्राची प्रत, छायाचित्र, सही स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply