नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर असताना त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची सदिच्छा भेट घेतली. या सर्व वरिष्ठ नेत्यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे.

शिंदे गटाच्या बंडाळीनंतर राज्यात नवीन सरकार स्थापन झालं. राज्यात मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाले. राज्यात सत्ता स्थापन झाल्यावर पहिल्यांदा मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस दिल्ली दौऱ्यावर होते. त्यामुळे त्यांच्या दिल्ली दौऱ्यावर एक वेगळे महत्व प्राप्त झाले. गेल्या दोन दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेतली.

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान मोदी यांच्या लोककल्याण मार्ग या शासकीय निवासस्थानी भेट झाली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. यावेळी त्यांच्यामध्ये दीड तास चर्चा झाली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी विठ्ठल-रखुमाईंची मूर्ती पंतप्रधान मोदी यांना भेट दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट आणि दिल्ली दौऱ्याविषयी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिलं होतं. एकनाथ शिंदे म्हणाले होते,'नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर दिल्लीत वरिष्ठ नेत्यांच्या आशीर्वादासाठी सदिच्छा भेट घेतली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची सदिच्छा भेट घेणार आहोत. या भेटीमागे कोणताही राजकीय अजेंडा नाही. सर्वसामान्य लोकांच्या मनातील सरकार अशी भूमिका घेऊन राज्यात सरकार स्थापन केलं. त्यामुळे वरिष्ठांच्या सदिच्छा भेटीसाठी आलो आहोत. आमचं सरकार लोकांच्या हिताचं जपणूक करणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारचे आशीर्वाद आवश्यक आहेत. राज्याच्या विकासासाठी नरेंद्र मोदींचे व्हिजन समजून घेणार आहोत'.

'राज्यातील संपूर्ण घडामोडीमध्ये बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे आशीर्वाद लाभले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही आशीर्वाद लाभले. तसेच भाजपचे वरिष्ठ नेते राज्य सरकाच्या पाठिशी आहेत. खासकरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापनेमध्ये महत्वाचा वाटा आहे. ज्या राज्याला केंद्राचं सहकार्य मिळतं, त्या राज्यात विकास लवकर होतो, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले होते.
 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply