उदयपूरमध्ये स्थानिकांचा मोर्चा; हजारो नागरिकांचा सहभाग; हत्या झालेल्या शिवणकाम व्यावसायिकाला न्याय देण्याची मागणी

पीटीआय, उदयपूर : भाजपच्या माजी प्रवक्त्या नूपुर शर्मा यांच्या वक्तव्याचे समर्थन केल्याने उदयपूरमध्ये एका शिवणकाम व्यावसायिकाची हत्या करण्यात आली. याच्या निर्षधार्थ उदयपूरमधील स्थानिक नागरिकांनी आणि हिंदु संघटनांनी मोठा मोर्चा काढला. या मोर्चात हजारो नागरिक सहभागी झाले होते. हत्या घडवणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्याची आणि शिवणकाम व्यावसायिकाला न्याय देण्याची मागणी मोर्चेकऱ्यांनी केली.

हत्येच्या निषेधार्थ शहरातील टाऊन हॉल येथे गुरुवारी सकाळी मोठय़ा प्रमाणात जनसमूह जमला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. आयोजकांनी हा शांतता मोर्चा असल्याचे घोषित केले होते, मात्र जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा समाप्त झाल्यानंतर काही नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

शिवणकाम व्यावसायिकाच्या हत्येनंतर कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी उदयपूरमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र या मोर्चाला परवानगी देण्यात आली आणि ज्या मार्गावरून मोर्चा गेला, त्या मार्गावरील संचारबंदी काही काळ शिथिल करण्यात आली, असे अतिरिक्त पोलीस महासंचालक दिनेश एम. एन. यांनी सांगितले.

‘आम्हाला सुरक्षा पुरवा!’

‘‘मागणी करूनही पोलिसांनी माझ्या वडिलांना सुरक्षा पुरवली नाही. मात्र आमच्या जिवालाही धोका असून आता तरी आम्हाला सुरक्षा पुरवा,’’ अशी मागणी कन्हैयालालचे पुत्र यश तेली यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वासन दिले आहे, असे त्यांनी सांगितले. हत्या करणाऱ्यांना मृत्यूदंडाशिवाय अन्य कोणतीही शिक्षा होऊ नये, अशी मागणी आम्ही केल्याचे त्यांनी सांगितले.

शिवणकाम व्यावसायिकाच्या कुटुंबीयांची मुख्यमंत्र्यांकडून भेट

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी गुरुवारी हत्या झालेला शिवणकाम व्यावसायिक कन्हैयालाल यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंदसिंह दोत्सारा, महसूलमंत्री रामलाल जाट, पोलीस महासंचालक एम. एल. लाथेर आणि काँग्रेसचे स्थानिक नेते या वेळी मुख्यमंत्र्यांसमेवत होते.

राष्ट्रीय तपास यंत्रणेने हे प्रकरण हाती घेतले असून जलदगती न्यायालयात हे प्रकरण चालवण्यात येणार आहे. दोषारोपपत्र लवकरात लवकर दाखल करण्यात येणार असून जेणेकरून आरोपींना शिक्षा करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांना सांगितले. ही घटना देश हादरवून सोडणारी आहे. पोलीस आणि विशेष कृती दलाने चांगले काम केल्याने आरोपी पकडले गेले, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply