आरेतील झाडांना तूर्त अभय; पुढील सुनावणीपर्यंत एकही वृक्ष न तोडण्याचे न्यायालयाचे आदेश

मुंबई : मेट्रो ३ (कुलाबा-वांद्रे-सीप्झ) मार्गिकेतील आरे कारशेडच्या कामासाठी पुढील सुनावणीपर्यंत आरेतील एकही झाड कापू नका, असे आदेश शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला (एमएमआरसी) दिले. पुढील सुनावणी १० ऑगस्टला होणार आहे.

राज्य सरकारने आरेतील कामाला देण्यात आलेली स्थगिती उठविल्यानंतर एमएमआरसीने मेट्रो ३ च्या गाडीचे डबे आणण्यासाठी अडचण ठरणाऱ्या झाडांच्या फांद्यांची छाटणी सुरू केली. या छाटणीच्या नावाखाली आरेत झाडे अवैधरित्या कापल्याचा आरोप पर्यावरण क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी केला होता.

आरे येथे प्रस्तावित कारशेडच्या जागेतील एकही झाड कापण्यात आले नसून आम्ही केवळ झुडपे कापल्याची माहिती यावेळी ‘एमएमआरसी’कडून न्यायालयात देण्यात आली. याप्रकरणाची सुनावणी नवीन खंडपीठासमोर होईल असेही आदेश यावेळी न्यायालयाने दिले. आता पुढील सुनावणी १० ऑगस्टला होणार आहे.

झाले काय?

आरेतील झाडे तोडण्यास सर्वोच्च न्यायालयाची बंदी असताना झाडे कापण्यात आल्याचा आरोप करून पर्यावरणप्रेमीनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर शुक्रवारी न्यायमूर्ती उदय लळीत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत एकही झाड कापू नये असे आदेश दिले.

दावे आणि प्रतिदावे..

कारशेडच्या जागेतील ८ ते ९ फूट उंचीची झाडे कापण्यात आली असून याची सर्व छायाचित्रे, पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा पर्यावरणप्रेमींनी केला आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) आपण आरे कारशेडमध्ये एकही झाड कापले नसून केवळ गवत आणि झुडपे कापल्याचे स्पष्टीकरण सर्वोच्च न्यायालयात दिले.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *