मुंबई: जन्मदात्यांनीच रचला दीड वर्षाच्या बाळाच्या मृत्यूचा बनाव; प्रत्यक्षात १ लाखात केली विक्री,

मुंबई: धारावी परिसरात एक अतिशय धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. ज्या पालकांनी आपल्या बाळाचे रक्षण करणे गरजेचे होते, त्यांनीच पैशांच्या हव्यासापोटी आपल्या दीड वर्षाच्या निष्पाप मुलाच्या मृत्यूचा खोटा बनाव रचला आणि प्रत्यक्षात त्याला १ लाख ५ हजार रुपयांना विकल्याचे उघड झाले आहे. या निंदनीय प्रकारामुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट पसरली आहे.

नेमके काय घडले? मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, ही घटना ६ ऑगस्ट रोजी सुरू झाली. बाळाच्या आईने आपल्या माहेरच्या मंडळींना फोन करून सांगितले की, मुलगा पावसात खेळत असताना पाय घसरून पडला आणि गंभीर जखमी झाला आहे. डोक्याच्या मागील बाजूस गंभीर इजा झाल्यामुळे त्याला उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल केल्याचे तिने सांगितले. ही माहिती मिळताच बाळाचे काका, सनी सिंग, तातडीने सायन रुग्णालयात पोहोचले. मात्र, तिथे गेल्यावर त्यांना आपले बाळ कुठेच दिसले नाही. त्यांनी रुग्णालयातील विविध वॉर्ड्समध्ये चौकशी केली, बहिणीशी आणि मेव्हण्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, बहिणीचा फोन बंद होता आणि मेव्हणा फोन उचलत नव्हता.

सत्य समोर आले आणि बाळाचा शोध सुरू या संशयास्पद प्रकारानंतर ८ ऑगस्ट रोजी सनी सिंग पुन्हा बहिणीच्या घरी गेले आणि मुलाबाबत जाब विचारला. त्यावेळी धक्कादायक सत्य समोर आले; बहिणीने कबूल केले की मुलाचा कोणताही अपघात झाला नव्हता, तर त्यांनी एका महिला दलाल (एजंट) मार्फत मुलाला १ लाख ५ हजार रुपयांना विकले होते. हे ऐकून सनी सिंग यांना मोठा धक्का बसला. यानंतर त्यांनी तातडीने बहीण आणि मेव्हण्याला धारावी पोलीस ठाण्यात नेऊन त्यांच्याविरुद्ध तक्रार नोंदवली.

पोलीस कारवाई या तक्रारीच्या आधारे धारावी पोलिसांनी बाळाचे आई-वडील आणि त्या महिला दलालाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस त्या महिलेचा आणि बाळाचा कसून शोध घेत आहेत. जन्मदात्यांनीच केलेल्या या कृत्यामुळे सर्वांचेच डोळे पाणावले असून, या निष्पाप बाळाला सुखरूप परत मिळवणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.



गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *