पुणे: पंढरीच्या वाटेवर तुकोबांची पालखी: भांडगावात पहिला विसावा, तर वरवंडमध्ये भाविकांकडून भक्तिमय स्वागत!

पुणे: जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा सोमवारी यवत येथून पुढील प्रवासाला रवाना झाला. विठ्ठलनामाचा अखंड गजर, टाळ-मृदंगाचा निनाद आणि "ज्ञानोबा-तुकोबा"च्या जयघोषात पालखीने भांडगाव येथे पहिला विसावा घेतला. यावेळी संतांच्या पादुकांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दर्शनानंतर हरिनामाच्या गजरात पालखीने पुढील प्रवास सुरू केला.

दुपारच्या सुमारास केडगाव-चौफुला येथे परंपरेनुसार पालखीचा मानाचा सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी वारकरी आणि भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावल्याने परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला. यानंतर पालखी वरवंडच्या दिशेने मार्गस्थ झाली.

 

दिवसभर कडक उन्हाचा तडाखा जाणवत असतानाही विठ्ठल दर्शनाची आस आणि नामस्मरणाचा उत्साह यामुळे वारकऱ्यांचा जोश कायम राहिला. श्रमाची पर्वा न करता वैष्णवांचा प्रवास अखंड सुरू राहिला.
सायंकाळी पालखी सोहळा वरवंड येथे मुक्कामी पोहोचला. गावाच्या प्रवेशद्वारावर ग्रामस्थांनी फुलांची उधळण, आरती आणि हरिनामाच्या जयघोषात पालखीचे उत्स्फूर्त स्वागत केले.

पालखीच्या आगमनाने संपूर्ण वरवंड परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला असून, मुक्कामासाठी आवश्यक व्यवस्था स्थानिक प्रशासन आणि ग्रामस्थांनी केली आहे.



विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *