Pune Gas Leak Horror: Massive Cylinder Blast in Khandvenagar Claims 3 Lives of a Family, Devastating the House

पुण्यात गॅस गळतीने भीषण स्फोट! आई, वडील आणि मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू; खांदवेनगरमधील संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त

Pune Gas Leak Horror: Massive Cylinder Blast in Khandvenagar Claims 3 Lives of a Family, Devastating the Houseचंदननगर (पुणे) : पुण्याच्या लोहगाव परिसरातील खांदवेनगर येथील 'फॉर्च्युन सिटी'मध्ये शनिवारी सकाळी नवीन एलपीजी (LPG) सिलिंडर जोडताना गॅस गळती होऊन एक अत्यंत भीषण स्फोट झाला. या हृदयद्रावक दुर्घटनेत एकाच कुटुंबातील तीन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, दोन जण सुदैवाने बचावले आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे.

नवीन सिलिंडर जोडताना घडली दुर्घटना अग्निशमन दलाचे खराडी केंद्रप्रमुख दत्तात्रय सातव यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी सुमारे ९.१५ वाजता फॉर्च्युन सिटी गल्ली क्र. ८ येथील तळमजला अधिक एक मजली आरसीसी इमारतीच्या पहिल्या मजल्यावर ही घटना घडली. घरात नवीन एलपीजी सिलिंडर जोडत असताना अचानक गॅस गळती (Gas Leak) झाली आणि त्याचा प्रचंड मोठा स्फोट होऊन घरात आग लागली.

घटनेची माहिती मिळताच खराडी, धानोरी, येरवडा आणि पीएमआरडीए (PMRDA) अग्निशमन केंद्रांची पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. जवानांनी होज रिलच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवले आणि गंभीर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले.

उपचारादरम्यान तिघांचा मृत्यू या स्फोटात होरपळलेल्या गीते कुटुंबातील तीन सदस्यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये विष्णू मुंजाजी गीते (वय ८२), वृंदाविनी विष्णू गीते (वय ६०) आणि पांडुरंग विष्णू गीते (वय ३५) यांचा समावेश आहे.

सून बाथरूममध्ये, नात बाल्कनीतून उडी मारून वाचली... पाच जणांच्या या कुटुंबातील दोघी जण या भीषण काळाच्या विळख्यातून सुदैवाने बचावल्या. पांडुरंग यांची पत्नी राजेश्री (वय २५) या अपघाताच्या वेळी बाथरूममध्ये असल्याने त्या सुरक्षित राहिल्या. त्यांची ६ वर्षांची मुलगी निहारिका घरात खेळत असताना स्फोटात तिचे हात व अंगाचा काही भाग भाजला. ती घाबरून धावत बाल्कनीत आली. खाली असलेल्या भाडेकरूंनी प्रसंगावधान राखून तिला खाली उडी मारण्यास सांगितले. निहारिकाने बाल्कनीतून खाली उडी मारली आणि तिचा जीव वाचला. तिच्यावर सध्या खांदवेनगर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या दुर्घटनेमुळे राजेश्री यांनी एकाच वेळी आपले पती, सासरे आणि सासू गमावले असून आता या कुटुंबात केवळ राजेश्री आणि त्यांची ६ वर्षांची मुलगी या दोघीच उरल्या आहेत.

घरातील साहित्य जळून खाक या आगीची तीव्रता एवढी भीषण होती की घरातील संपूर्ण हॉल जळून खाक झाला. फर्निचर, विद्युत वायरिंग, बाथरूम व शौचालयाचे दरवाजे, गिझर आणि स्वयंपाकघरातील फ्रिजचे मोठे नुकसान झाले आहे. संपूर्ण फ्लॅटमध्ये धूर पसरल्याने सर्व भिंती काळवंडल्या आहेत. अग्निशमन दलाचे अधिकारी प्रमोद सोनवणे, दत्तात्रय सातव, किरण चौधरी, सतीश पोडघन, शंकर वाबळे व अमित वाघ यांनी ही आग आटोक्यात आणली.



विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *