Pune : पुणेकरांना दिलासा! कात्रज–कोंढवा रस्ता रुंदीकरणाला वेग; भू-संपादनासाठी कोट्यवधी मिळाले, 32% काम पूर्ण

Pune : शहरातील सर्वाधिक वाहतूक कोंडीचा सामना करणाऱ्या कात्रज–कोंढवा मार्गावरील नागरिकांसाठी दिलासादायक घडामोड समोर आली आहे. या महत्त्वाच्या रस्ता रुंदीकरण प्रकल्पाला राज्य शासनाने गती दिली असून भू-संपादनासाठी कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार प्रकल्पाला प्राधान्य देत कामे वेगाने सुरू करण्यात आली आहेत.

कात्रज–कोंढवा मार्ग हा शहरातील दोन राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा अत्यंत महत्त्वाचा दुवा असल्याने येथे वाहतुकीचा ताण दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या या मार्गावर ताशी सुमारे १५ हजारांहून अधिक वाहनांची वर्दळ असून त्यात अवजड वाहनांचे प्रमाण मोठे आहे. बोपदेव घाट आणि दिवे घाटमार्गे येणारी वाहतूक याच रस्त्यावर अवलंबून असल्याने दररोज मोठ्या प्रमाणात कोंडी होत आहे. या पार्श्वभूमीवर पहिल्या टप्प्यात ५० मीटर रुंदीचा रस्ता विकसित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. एकूण ८४ मीटर रुंदीच्या आराखड्यातील हा पहिला टप्पा असून जून २०२६ पर्यंत तो पूर्ण करण्याचे नियोजन आहे. यासाठी ३.५ किलोमीटर लांबीच्या रस्त्यावरील भू-संपादन प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.

पहिला टप्पा आणि निधी
पहिल्या टप्प्यात १२९ मिळकतींमधील सुमारे ५२,६३० चौरस मीटर क्षेत्र संपादित केले जाणार आहे. प्रत्यक्ष जागेवर बॉण्ड्री मार्किंग आणि झाडांची मोजणी सुरू असून विविध विभागांमध्ये समन्वय साधत ही प्रक्रिया राबवली जात आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त समिती यावर देखरेख करत आहे.

या प्रकल्पासाठी राज्य शासनाकडून सुमारे ₹१४० कोटी, तर महापालिकेकडून सुमारे ₹३०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. भू-संपादनासाठी आवश्यक १०० टक्के निधी उपलब्ध झाल्याने प्रकल्पाला आर्थिक बळ मिळाले आहे.

३२ टक्के काम पूर्ण
रुंदीकरणाच्या पहिल्या टप्प्यात मुख्य रस्ता, दोन्ही बाजूंना सर्विस रस्ते, पावसाळी वाहिन्या तसेच माऊली नगर येथे ग्रेड सेपरेटर उभारण्यात येणार आहे. अंतिम आराखड्यात सायकल ट्रॅक, फूटपाथ, पार्किंग आणि युटिलिटी डक्टचा समावेश असेल. दरम्यान, NHAI मार्फत राजस चौक येथे उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाच्या कामामुळे वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सुमारे ४०० मीटर लांबीचे सर्विस रस्ते विकसित केले जात आहेत.

सध्या या प्रकल्पाचे सुमारे ३२ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम वेगाने सुरू आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कात्रज–कोंढवा मार्गावरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *