Mumbai : मुंबईत वाढता उन्हाचा चटका; तापमान वाढीसोबत हवेची गुणवत्ता सुधारली, प्रदूषणात 14-17% घट

Mumbai :  राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असून पुन्हा उन्हाचा चटका वाढू लागला आहे. ९ एप्रिल रोजी मुंबई आणि ठाणे परिसरात दिवसभर अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून उष्णतेच्या झळाही जाणवू शकतात.

दरम्यान, जानेवारी ते मार्च २०२६ या कालावधीत मुंबईतील हवेच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. यंदा ‘पीएम २.५’ या सूक्ष्म प्रदूषकाच्या पातळीत सरासरी १४ टक्के, तर ‘पीएम १०’मध्ये १७ टक्के घट नोंदली गेली आहे. या सुधारणेमागे प्रामुख्याने वाऱ्यांच्या दिशेतील बदल तसेच प्रदूषण नियंत्रणासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचा प्रभाव असल्याचे दिसते.

अहवालातून महत्त्वाचे निष्कर्ष
‘रेस्पायरर लिव्हिंग सायन्सेस’ने ‘अॅटलास एक्यू’च्या आकडेवारीचे विश्लेषण करत २०२४, २०२५ आणि २०२६ या तीन वर्षांतील प्रदूषण निर्देशांकाचा अभ्यास केला. २०२५मध्ये २०२४च्या तुलनेत प्रदूषण वाढले होते; मात्र २०२६मध्ये परिस्थितीत सुधारणा दिसून आली.

२०२६मध्ये ‘पीएम २.५’ पातळीत जानेवारीत १५.४ टक्के, फेब्रुवारीत ५.२ टक्के आणि मार्चमध्ये २१.६ टक्के घट झाली. ‘पीएम १०’मध्येही जानेवारीत १७.९ टक्के, फेब्रुवारीत १२ टक्के आणि मार्चमध्ये २०.७ टक्के घट नोंदवली गेली.

हवेची गुणवत्ता ‘समाधानकारक’ स्तरात
या कालावधीत दैनंदिन सरासरीनुसार ‘पीएम २.५’ पातळी ‘समाधानकारक’, तर ‘पीएम १०’ ‘मध्यम’ श्रेणीत होती. ‘वाईट’ किंवा ‘गंभीर’ श्रेणीतील प्रदूषणाचे प्रमाण अत्यल्प राहिले. मार्च २०२६मध्ये ‘पीएम २.५’ पातळी तब्बल १५ दिवस ‘चांगल्या’ श्रेणीत होती, जे गेल्या तीन वर्षांतील सर्वात कमी प्रदूषणाचे प्रमाण ठरले.

तथापि, सकाळी ८ ते ११ या वेळेत प्रदूषणाची पातळी सातत्याने जास्त आढळली. यामागे सकाळचा वाहतूक ताण आणि मानवी हालचाली कारणीभूत असल्याचे निरीक्षण नोंदवले गेले आहे.

पावसाचा सकारात्मक परिणाम
जानेवारी २०२६च्या सुरुवातीला झालेल्या पावसामुळे हवेतिल सूक्ष्म कण कमी होण्यास मदत झाली. त्यानंतर तापमान वाढल्याने प्रदूषकांचे वहन सुलभ झाले, ज्यामुळे हवेची गुणवत्ता सुधारण्यास हातभार लागला.

तज्ज्ञांच्या मते, सकाळच्या गर्दीच्या वेळेत वाहतूक आणि बांधकामांवर नियंत्रण ठेवल्यास प्रदूषण आणखी कमी करण्यास मदत होऊ शकते.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *