Pune : रात्रीच्या अंधारात भीषण अपघात; चिंचवडच्या कुटुंबाची कार बसखाली घुसली — आई, वडील आणि आजीचा मृत्यू; दोन लहान मुले अनाथ

Pune : पुणे-नाशिक महामार्गावर मंचर (ता. आंबेगाव) येथे खासगी बस व कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून, दोन मुले जखमी झाली आहेत. एकाच वेळी आई-वडिलांसह आजीचंही छत्र हरपल्याने किशोरवयीन मुलं पोरकी झाली आहेत.

मल्लिकार्जुन शिवराज आंबेगावे (वय ४८), त्यांच्या पत्नी आरती (वय ४०) व त्यांच्या आई लता तूपलोंढे (वय ६३, रा. तिघेही चिंतामणी कॉलनी, वाल्हेकरवाडी चिंचवड) अशी मृतांची नावे आहेत. आंबेगावे यांची मुलगी मृणाल (वय १६) आणि मुलगा प्रेम (२०) हे जखमी असून, त्यांच्यावर मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.

कसा झाला अपघात?
मल्लिकार्जुन आंबेगावे नाशिकहून एक कार्यक्रम उरकून पिंपरी-चिंचवडकडे घराकडे परतत होते. मंचरजवळील एकलहरे येथे रात्री अकरा वाजता त्यांचा कारवरील ताबा सुटल्याने ती दुभाजक ओलांडून थेट विरुद्ध दिशेने पुण्याकडून नाशिककडे जाणाऱ्या खासगी बसवर जाऊन आदळली. ही धडक एवढी भीषण होती, की कारचा चक्काचूर झाला आणि ती बसच्या खाली घुसली. अपघातात तिघांचाही जागीच मृत्यू झाला होता. कार बसखाली अडकल्यामुळे कारमधील प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी कसरत करावी लागली. सर्वांना तातडीने मंचर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तपासून तिघांना मृत घोषित केले.

बसचालक राजू चत्रू राठोड (वय ३८, रा. उजळत, ता. शहादा, जि. नंदुरबार) याने मंचर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या अपघातात आंबेगावे यांचा मुलगा व मुलगी बचावले असून, त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खासगी बसमधील काही प्रवासी किरकोळ जखमी आहेत, अशी माहिती मंचर पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्रीकांत कंकाळ व सहायक फौजदार सनील धनवे यांनी दिली. पोलिसांनी आंबेगावे यांच्याविरोधात निष्काळजीपणे वाहन चालविल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे.

रस्त्याच्या कामांमुळे अपघात?
महामार्गावरील सुधारणांची कामे बाकी असल्यामुळेच व महामार्गाची रचना सदोष असल्याने या भागात वारंवार अपघात होतात, असा आरोप येथील स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे.

दोन मुलं पोरकी
या अपघातात मल्लिकार्जुन आंबेगावे आणि त्यांच्या पत्नी आरती मृत्युमुखी पडले. त्यांची दोन्ही मुले वाचली. मात्र, आई-वडिलांचे छत्र हरपल्याने ही मुले पोरकी झाली. आई-वडिलांबरोबरच आजीलाही गमावण्याची वेळ या मुलांवर आली. त्यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात आली.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *