इन्स्टाग्रामवरील ओळख ठरली घातक; धर्मांतरासाठी दबाव, ५ लाखांची मागणी अन् फोटो व्हायरल करण्याची धमकी!

नाशिकमधील भद्रकाली पोलिस ठाण्यात एका अत्यंत गंभीर प्रकरणी धर्मांतरविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन असल्यापासून लैंगिक शोषण, अश्लील व्हिडिओच्या माध्यमातून ब्लॅकमेलिंग करणे तसेच लग्नासाठी धर्मांतराचा बळजबरीने दबाव टाकल्याची तक्रार पीडित तरुणीने दिली आहे. याप्रकरणी अमन खान या संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, इन्स्टाग्रामवरील ओळखीचा गैरवापर करून हा प्रकार केल्याचे समोर आले आहे.

नेमकी घटना काय? तक्रारीत नमूद केल्यानुसार, २०२१ मध्ये पीडिता जेव्हा अकरावी इयत्तेत शिकत होती, तेव्हा तिची ओळख आरोपीशी झाली. या ओळखीचा फायदा घेऊन आरोपीने लग्नाचे आमिष दाखवले आणि पीडितेशी जवळीक वाढवली. पीडिता अवघ्या १६ वर्षांची अल्पवयीन असताना नाशिकमधील एका लॉजवर तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यानंतरही वेगवेगळ्या ठिकाणी हे शोषण सातत्याने सुरूच राहिल्याचे पीडितेने म्हटले आहे.

धर्मांतराचा आग्रह आणि निर्बंध पीडिता सज्ञान झाल्यानंतर जेव्हा तिने आरोपीकडे लग्नाविषयी विचारणा केली, तेव्हा त्याने लग्नासाठी अट घातली. त्यानुसार, पीडितेने आणि तिच्या कुटुंबीयांनी आपले धर्मांतर करावे, असा मोठा दबाव आरोपीकडून टाकण्यात आला. एवढेच नव्हे तर, बुरखा घालण्यासह तिच्यावर इतर अनेक धार्मिक निर्बंधही लादण्यात आल्याचा आरोप पीडितेने केला आहे.

फोटो व्हायरल करण्याची धमकी आणि ५ लाखांची मागणी आरोपीने पीडितेचे अश्लील फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी देत तब्बल ५ लाख रुपयांची खंडणी मागितली. या सततच्या धमक्यांमुळे आणि मानसिक त्रासामुळे पीडिता व तिच्या कुटुंबीयांमध्ये कमालीची भीती निर्माण झाली होती. पीडितेने आरोपीशी सर्व संबंध तोडण्याचा प्रयत्न केला असता, तो वारंवार फोन करून संपर्क साधण्याचा प्रयत्न करायचा आणि धमकावत असे.

नवीन धर्मांतरविरोधी कायदा अस्तित्वात आल्यानंतर नाशिक शहरातील हा पहिलाच गुन्हा दाखल झाल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांनी दुजोरा देत दिली आहे. सध्या भद्रकाली पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत असून संशयित आरोपीचा शोध घेतला जात आहे.



शहर

महाराष्ट्र

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *