चिपळूण : ६० कि. मी.पर्यंत एकच टोल नाका; गडकरीची घोषणेमुळे संभ्रम

चिपळूण : केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्गावर साठ किलोमीटरच्या अंतरावर एकच टोल नाका चालू राहील, अशी घोषणा केली. रत्नागिरी जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाके केवळ ४० ते ५० कि.मी.च्या अंतरावर असणार आहेत. गडकरी यांच्या घोषणेनुसार या टोल नाक्यांमधील अंतर कमी होणार का, याकडे वाहनचालक आणि नागरिकांचे लक्ष लागलेले आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी लोकसभेत टोल नाक्यांसंबंधी मोठी घोषणा केली होती. त्यानुसार राष्ट्रीय महामार्गावर आता ६० कि.मी.च्या अंतरात एकच टोल नाका असेल, या परिघात दुसरा टोल नाका आढळल्यास तो तीन महिन्यांच्या आत बंद करण्यात येईल, अशीही माहिती गडकरी यांनी दिली.

नॅशनल हायवे फी, २००८ (डिटर्मिनेशन ऑफ रेट्स अँड कलेक्शन) या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नियमांनुसार दोन टोल नाक्यांमध्ये साठ कि.मी. इतके अंतर असावे, असा नियम असून देशातील सर्व राज्यांना तो लागू आहे, असे गडकरी यांनी सांगितले आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण सुरू आहे. चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या कंपन्यांना ४० कि.मी. पर्यंतचा रस्ता बांधण्यासाठी देण्यात आला आहे.

चौपदरीकरण पूर्ण झाल्यानंतर संबंधित कंपन्याचे टोल नाके बसविले जाणार आहेत. परशुराम घाट ते कशेडी घाट हा रस्ता कल्याण टोलवेल कंपनीला देण्यात आला आहे. या कंपनीने ७० टक्के काम पूर्ण केले आहे. खेड, चिपळूण, संगमेश्वर आणि रत्नागिरी या दरम्यान ४० ते ५० कि.मी. अंतरावर टोल नाके ठेवण्यात येणार आहेत.

 


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply