Wardha Crime : भाड्याची खोली करून नागपूरमध्ये वास्तव्य; मोबाइल चोरून बांगलादेशात विक्री करण्याचा धंदा, झारखंड येथून चोरटा ताब्यात

Wardha : वर्धा शहरातील बसस्थानक तसेच मार्केट परिसरात गर्दीच्या ठिकाणी जात नागरिकांचे महागडे मोबाइल चोरीला जाण्याचे प्रकार सुरू होते. याचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सायबर सेलच्या मदतीने मोबाइल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. यातील एका अट्टल मोबाइल चोरट्यास झारखंड येथून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच चोरीचे मोबाईल जप्त केले आहेत.

महाराष्ट्रातील विविध जिल्हे तसेच शहरातून चोरलेले महागडे मोबाइल बांगलादेश येथे विक्री करत असल्याची माहिती समोर आली आहे. आर्यन नोनिया (रा. सी. पी. धारवा ऑफीस पारा, बारघेमो, बर्धमान, वेस्ट बंगाल) असे अटक केलेल्या अट्टल मोबाइल चोराचे नाव आहे. दरम्यान प्रकाश विनायक देशमुख (रा. आंजी) हे ११ मे रोजी बसने वर्धा येथे आले होते. गर्दीचा फायदा घेत चोरट्याने त्यांचा मोबाईल चोरला होता. याबाबतची तक्रार प्रकाश यांनी सायबर पोलिसांकडे दिली होती.

नागपूरमध्ये भाड्याची खोली घेऊन वास्तव्य

दरम्यान अट्टल चोरटा आणि त्याचे इतर सहकारी नागपूर येथील प्रजापतीनगर पार्डी येथे भाड्याची खोली करून राहात होते. नागपूर येथे राहून बाजाराच्या दिवशी इतर जिल्ह्यात तसेच गाव शहरात जाऊन ते मोबाइल चोरी करत असल्याचे पोलिसांना चोरट्याने सांगितले. मोबाईल चोरी केल्यानंतर हि टोळी काही दिवस फरार राहायची. यानंतर पुन्हा खोलीवर राहण्यासाठी येत होते.

Wardha News : ६८व्या वर्षी इंदूताईंना शिक्षणाचं वेड, १०वीची परीक्षा दिली, नातवासोबत पास होऊन करुन दाखवलं

झारखंड येथे जात घेतले ताब्यात

यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सायबर पोलिसांच्या मदतीने तपासाला सुरुवात केली. तपासादरम्यान तांत्रिक बाबींचा वापर तसेच गोपनीय माहितीच्या आधारे मोबाइल चोरांची टोळी झारखंड राज्यातील महाराजपूर बाजार येथील असल्याचे समजले. पोलिसांनी झारखंड येथे जात रेल्वे पोलिसांच्या मदतीने त्यास बेड्या ठोकल्या. आरोपी चोरट्याविरूद्ध इतरही गुन्हे दाखल असून तो आणखी एका गुन्ह्यात सहभागी असल्याचे निष्पन्न झाले आहे. तर इतर आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक देखील रवाना झाल्याची माहिती आहे.

३ लाख ४० हजाराचे मोबाईल जप्त

चोरटा आर्यन रेल्वेगाडीतून झारखंड येथे जात असल्याचे पोलिसांना समजले. रेल्वे पोलिसांच्या मदतीने झारसुगुडा, ओरीसा येथे जात त्यास ताब्यात घेत अटक केली. पोलिसांनी ३ लाख ४० हजार रुपये इतक्या किंमतीचे ३५ मोबाईल चोरट्याकडून पोलिसांनी हस्तगत केले. पुढील तपास सायबर सेलकडून सुरु आहे. शहरासह जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्याचा रेकॉर्ड देखील तपासण्याची आवश्यकता आहे. इतर शहरातही मोबाईल चोरीच्या घटना घडलेल्या असून त्या चोरींची देखील लिंक उघडण्याची शक्यता आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply