Vashi Car Accident: एअर बॅगने घेतला चिमुकल्याचा जीव! पाणीपुरी खायला जाताना झाला कारचा अपघात

 

Vashi Accident : नवी मुंबईच्या वाशी परिसरात एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये सहा वर्षीय हर्ष आरैठियाचा मृत्यू झाला. अपघातादरम्यान गाडीत एअर बॅग उघडल्याने त्याने जीव गमावला. हर्षच्या कारच्या समोरच्या एसयूव्हीने रस्त्याच्या दुभाजकाला धडक दिली. त्या गाडीचा मागचा भाग हर्षच्या कारच्या बोनटवर पडला आणि एअर बॅग अचानक उघडली गेली. या अपघातानंतर पोलिसांनी एसयूव्हीचे मालक कॉस्मेटिक सर्जन डॉ. विनोद पचाडे यांच्यावर गुन्हा दाखल केला.

हर्षचे वडील मावजी आरैठिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्ष आणि त्यांच्या भावंडांनी पाणीपुरी खाण्याचा आग्रह केला होता. पाणीपुरी खाण्यासाठी सर्वजण कारमध्ये बसले. मावजी गाडी चालवत होते, हर्ष त्यांच्या बाजूला बसला होता आणि बाकीचे मागच्या सीटवर बसले होते. रात्री ११.३० च्या आसपास ते वाशीच्या सेक्टर २८ मधील ब्लू डायमंड हॉटेल जंक्शनजवळ होते. त्यांच्या कारपुढे एक एसयूव्ही होती. क्षणार्धात ती एसयूव्ही जोरात जाऊन रस्त्याच्या दुभाजकावर आपटली आणि तिच्या मागचा भाग हवेत जोरात उडून आरैठियांच्या कारच्या बोनेटवर आदलला. त्या झटक्यात कारची एअर बॅग उघडली.

हर्षच्या शरीरावर जखमांच्या खुणा नव्हत्या. डॉक्टरांच्या मते, हर्षचा मृत्यू पॉलीट्रॉमाच्या शॉकमुळे झाला. पॉलीट्रॉमा म्हणजे शरीराला एकापेक्षा जास्त जागी दुखापत होणे. शरीराच्या आत दुखापत होऊन रक्तस्राव झाला आणि त्यामुळे हर्षचा मृत्यू झाला. अपघातात मावजी आणि हर्षच्या भावंडांनाही किरकोळ जखमा झाल्या.

वाशी पोलीस स्थानकाचे सहाय्यक निरीक्षक दीपक गावित यांनी या प्रकरणाची माहिती दिली. "एअर बॅग उघडल्यानंतर हर्ष बेशुद्ध पडला. रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान अपघातानंतर प्रमुख आरोपी डॉ. पचाडे घटनास्थळाहून पळून गेले नाही. त्यांनी वाशी पोलीस स्थानकामध्ये अपघाताची माहिती देत चूक मान्य केली. तपासात सहकार्य करायचे आणि न्यायालयात उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत", असे गावित म्हणाले आहेत.

अपघातांपासून बचाव व्हावा यासाठी एअर बॅग्स आवश्यक मानल्या जातात. पण काही वेळेस त्यांच्यामुळे शरीराला दुखापत देखील होऊ शकते. १३ वर्षांखालील लहान मुलांनी कारच्या पुढच्या सीटवर बसणे टाळावे असा सल्ला तज्ञ देतात.

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply