Vande Bharat Train : लातूरकरांसाठी गौरवास्पद ! १२० वंदे भारत रेल्वे गाड्यांची निर्मिती हाेणार लातूरात

Latur News : भारत सरकारच्या अंगीकृत उपक्रम असलेल्या रेल विकास निगम लिमीटेड आणि रशियाच्या सीजेएससी ट्रान्समास कॅसोर्टियम या दोन कंपन्यांच्या संयुक्त माध्यमातून २०० वंदे भारत रेल्वेची निर्मिती केली जाणार आहे. त्यापैकी १२० वंदे भारत रेल्वे गाड्या लातूरच्या मराठवाडा रेल्वे कारखान्यात तयार होणार आहेत अशी माहिती रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य शामसुंदर मानधना यांनी दिली.

मराठवाडा रेल्वे कोच कारखाना चालवायला घेण्यासाठीच्या निविदा प्रक्रियेत भाग घेऊन सर्वात कमी बोली सांगणारी कंपनी म्हणून रेल विकास निगम लिमीटेड आणि रशियाच्या सीजेएससी ट्रान्समास कॅसोर्टियम या दोन कंपन्या प्रथमतः पुढे आल्या आहेत. या दोन कंपन्यांसोबत करार करण्यासंबंधीची प्रक्रिया सध्या सुरु आहे. निश्चित करण्यात आलेल्या २०० पैकी १२० वंदे भारत रेल्वे गाड्या लातूरच्या मराठवाडा रेल्वे कारखान्यात तयार होणार आहेत तर उर्वरित ८० रेल्वेगाड्या चेन्नई येथे उत्पादित होणार आहेत.

१२० रेल्वेसाठी १९२० कोच लातूर  मध्ये उत्पादित होणार आहेत. यासाठीची ५८ हजार कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. मराठवाडा रेल्वे कोचसाठी भेल अर्थात भारत हेवी इलेकट्रीकल्स आणि टिटागड वॅगन्स या दोन कंपन्यांनीही निविदा प्रक्रियेत सहभाग घेतला होता.

या दोन कंपन्यांनाही रेल्वे विभागाने उत्पादन प्रक्रियेत सहभागी करून घेतले आहे. याप्रक्रियेत देशातील आणि देशाबाहेरील इतरही अनेक कंपन्यानी सहभाग घेतला होता. वंदे भारत रेल्वेच्या सर्व बोगी स्टीलमध्ये बनविण्यात येणार आहेत.

वंदे भारत ही सेमी हाय स्पीड ट्रेन असून ज्यामध्ये १६ सेल्फ प्रोफेल्ड कोच आहेत. विशेष म्हणजे तिला वेगळ्या इंजिनची आवश्यकता असणार नाही. या रेल्वे गाड्या वातानुकूलित असून जिवाणू विरोधी प्रणाली यामध्ये असणार आहे. १४० सेकंदात १६० किमी ताशी वेग घेण्याची क्षमता या गाड्यांमध्ये असणार आहे.

केंद्र सरकारने २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात २०२४ ते २०२५ च्या अखेरीस भारतात ४०० वंदे भारत रेल्वे गाड्या तयार करण्याचे महत्वकांक्षी लक्ष्य ठेवले आहे. परदेशातही या वंदे भारत रेल्वे गाड्या पाठविण्याचा सरकारचा मानस आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply