Uday Samant : महाराष्ट्रातील 215 आमदारकीच्या आणि लोकसभेच्या 45 जागा आम्ही सहज जिंकू - उदय सामंत

चिपळूण : निधी वाटपावरून महायुतीमधील राष्ट्रवादीचा कोणताही आमदार नाराज नाही. महायुतीमध्ये गैरसमज पसरवण्याचा काम काहीजण बालिश पद्धतीने करत आहेत, असे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी चिपळूण येथे पत्रकारांना सांगितले.

वाशिष्टी नदीतील गाळ काढण्याचे काम पावसाळ्यानंतर सोमवारपासून सुरू झाले. या कामाच्या भूमिपूजनप्रसंगी पालकमंत्र्यांना राष्ट्रवादीचे आमदार निधी वाटपावरून नाराज असल्याचे पत्रकारांनी विचारल्यानंतर ते म्हणाले, ‘‘रत्नागिरी जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार आमच्यासोबत आहेत. त्यांनी निधी कमी पडल्याचे पालकमंत्री म्हणून किंवा मित्र म्हणून मला कधीही सांगितले नाही.

Pune News : मिळकत करात ४० टक्के सवलतीचा अर्ज भरण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

महाराष्ट्रातील कोणीही आमदार नाराज असेल असे मला वाटत नाही. महायुतीबद्दल कुठेतरी गैरसमज किंवा संभ्रम निर्माण करावा, असे काहींना वाटते. यातून युतीमध्ये दुरावा निर्माण होईल, असे काही जणांना वाटते; परंतु असे काहीही होणार नाही.

नुकताच ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल लागला. उपमुख्यमंत्री अजित पवार,देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल जे काय बोलले जात होते. २३२३ पैकी १४०० सरपंच महायुतीचे निवडून आले. इतर साडेचारशे पैकी दीडशे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. तेवढेच बीजेपी आणि राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत. त्यामुळे आपली ताकद फार मोठी आहे, असे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न कोणी करू नये.

खासदारकी खूप सोपी

काँग्रेस पक्षाची भूमिका आता जनतेसमोर आली आहे. ग्रामीण भागातील जनतेने महायुतीच्या भूमिकेचा स्वीकार केला आहे. त्यामुळे आमदारकी आणि खासदारकी आमच्यासाठी खूप सोपी आहे. महाराष्ट्रातील २१५ आमदारकीच्या जागा आणि ४५ लोकसभेच्या जागा आम्ही सहज जिंकू, असा दावा पालकमंत्री सामंत यांनी केला.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply