Tomato Rate : टोमॅटोचे भाव मातीमोल: संतप्त शेतकऱ्यांनी उपबजार आवारात टोमॅटो टाकून केला निषेध

नारायणगाव - लाल झालेली टोमॅटो खरेदी करण्यास व्यापाऱ्यांनी टाळाटाळ केल्यामुळे जुन्नर, पारनेर, आंबेगाव, शिरूर तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेली टोमॅटो आज दुपारी जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव उपबजारात टाकून निषेध केला. यामुळे उपबजार आवारात टोमॅटोचा लाल सडा पडला होता. काही वेळ व्यापारी व शेतकरी यांच्यात तणाव निर्माण झाला होता. बाजार समितीचे संचालक ज्ञानेश्वर खंडागळे, प्रियांका शेळके, सचिव रुपेश कवडे, उपसचिव शरद घोंगडे यांच्या मध्यस्थी नंतर टोमॅटो लिलाव पुन्हा सुरू झाले.

तापमानात वाढ झाल्याने टोमॅटो लाल व खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे.मागील पंधरा दिवसां पासून टोमॅटोची आवक वाढली असून भाव मातीमोल झाले आहेत. यामुळे टोमॅटो उत्पादकांना कोट्यवधी रुपयांचा तोटा झाला आहे.

टोमॅटो खरेदी नंतर चार ते पाच तासात टोमॅटो फळातून पाणी सुटत असल्याने तोटा टाळण्यासाठी व्यापाऱ्यांनी लाल टोमॅटो खरेदी बंद केली आहे. येथील उपबजारात आज सुमारे तीस हजार टोमॅटो क्रेटची आवक झाली होती. सकाळी नऊ ते बारा वाजेपर्यंत व्यापाऱ्यांनी चांगल्या गजरा टोमॅटो प्रतवारी नुसार ५० रुपये ते १०० रुपये भाव देऊन खरेदी केली. लाल टोमॅटोची खरेदी करण्यासाठी शेतकरी व्यापाऱ्यांची मनधरणी करत होते.

मात्र टोमॅटोची खरेदी व्यापाऱ्यांनी बंद केली. यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सुमारे तीनशे क्रेट लाल टोमॅटो उपबजार आवारात टाकून निषेध केला. या मुळे उपबजार आवारात वातावरण तप्त झाले. या बाबतची माहिती समजल्या नंतर बाजार समितीचे माजी सभापती रघुनाथ लेंडे, भाजपचे तालुका अध्यक्ष संतोष खैरे, माजी सरपंच योगेश पाटे, संचालक ज्ञानेश्वर खंडागळे, प्रियांका शेळके, माजी संचालक विपुल फुलसुंदर, प्रसन्ना डोके, बाबा परदेशी, बाजार समितीचे सचिव रुपेश कवडे, उपसचिव शरद घोंगडे उपबजार आवारात दाखल झाले. त्यांनी शेतकरी प्रतिनिधी व व्यापारी प्रतिनिधी यांच्याशी चर्चा केली. या वेळी टोमॅटो टाकून देण्यावरून संचालक खंडागळे, पाटे व शेतकरी यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. उपसचिव शरद घोंगडे यांनी शिल्लक टोमॅटो खरेदी करण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले. त्यानंतर दुपारी तीन नंतर टोमॅटोचे लिलाव पुन्हा सुरळीत सुरू झाले.

गोविंद काशीद शेतकरी (शेतकरी पोखरी कण्हेर, ता. पारनेर), अनिल ढोले (शेतकरी येणेरे, ता. जुन्नर) - एकरी एक लाख रुपये खर्च करून ऐन उन्हाळ्यात घाम गाळून टोमॅटोचे उत्पादन घेतले आहे. तापमान वाढल्यामुळे टोमॅटो लाल होण्याचे प्रमाण वाढल्याने एक तोड्याला एकरी १०० क्रेट उत्पादन निघत आहे. तोडणी, मजुरी वाहतूक भाडे या साठी प्रति क्रेट सत्तर रुपये खर्च झाला आहे. उपबजारात आल्या नंतर टोमॅटो खरेदी करण्यास व्यापारी टाळाटाळ करत आहेत. यामुळे मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.

दत्ता शिंगोटे, योगेश घोलप (टोमॅटो व्यापारी) - राज्यातील टोमॅटोची मुख्य बाजारपेठ असलेल्या नाशिक बाजार समितीत सुद्धा चार दिवसापूर्वी शेतकऱ्यांनी उपबजार आवारात टोमॅटो क्रेट टाकून दिले आहेत. आवक वाढल्याने व मागणी नसल्यामुळे राज्यात टोमॅटोचे भाव कोसळले आहेत. तापमान वाढीमुळे फळावर तिरंगा रोगाचा प्रादुर्भाव झाला असून, लाल टोमॅटो खरेदी नंतर चार ते पाच तासात टोमॅटो फळातून पाणी सुटत आहे. मागील आठ दिवसात व्यापाऱ्यांना लाखो रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. कर्ज काढून शेतकऱ्यांचे पैसे द्यावे लागले आहेत. व्यापाऱ्याची बाजू कोणी समजून घेत नाही.

शरद घोंगडे (उपसचिव बाजार समिती) - टोमॅटोची आवक वाढली आहे.तापमान वाढीमुळे लाल टोमॅटो इतर राज्यात विक्रीसाठी पाठविल्यास खराब होतात. राज्यातील सर्व भागात टोमॅटोचे भाव मातीमोल झाले आहेत. आज सकाळी लिलाव सुरळीत सुरू होते. मात्र काही शेतकऱ्यांनी टोमॅटो आवारात टाकून दिल्याने तणाव वाढला. बाजार सुरू राहण्यासाठी व्यापारी व शेतकरी हे दोन्ही घटक महत्वाचे आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply