Tax Recovery : ग्रामपंचायत विभागाला ३५० कोटी रुपयांची घरपट्टी व पाणीपट्टी वसूल करण्यात यश

पुणे - जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाला सरत्या आर्थिक वर्षअखेरपर्यंत (२०२२-२३) सुमारे ३५० कोटी रुपयांची घरपट्टी व पाणीपट्टी वसूल करण्यात यश आले आहे. यासाठी गेल्या आर्थिक वर्षात आयोजित करण्यात आलेल्या लोकअदालतींचा चांगला फायदा झाला आहे. मात्र वसुलीच्या अखेरच्या महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांनी सुरु केलेल्या बेमुदत संपामुळे या कराच्या वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यात अपयश आले आहे.

गेल्या आर्थिक वर्षातील ग्रामपंचायत कराची ४२४ कोटी रुपयांची वसुली करण्याचे उद्दिष्ट जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्यावतीने ठेवण्यात आले होते. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी वर्षभरात तीन ते चार लोकअदालतींचे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतींचा फायदा हा ग्रामपंचायत कराची थकबाकी वसूल करण्यासाठी झाल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमार्फत गावपातळीवर आपापल्या कार्यक्षेत्रातील कुटुंबांकडून घरपट्टी, पाणीपट्टी व दिवाबत्ती कराची वसुली करण्यात येते. यानुसार दरवर्षी मार्चअखेर पर्यंत जास्तीत जास्त कर वसूल करण्यासाठी प्रयत्न केले जातात. यासाठी आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यात म्हणजेच मार्च महिन्यात अधिकाधिक वसुली करण्यावर भर दिला जातो. यंदा मात्र याच महिन्याच्या १४ तारखेपासून सर्वच सरकारी कर्मचारी हे बेमुदत संपावर गेले होते. हा संप आठवडाभर चालला आणि त्यानंतर आलेल्या काही सरकारी सुट्ट्यांमुळे यंदाच्या मार्च महिन्यातील केवळ दहा ते बाराच दिवस हे कर वसुलीसाठी मिळाले. याचा परिणाम हा करवसुलीवर झाला आहे. परिणामी कर वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यात अपयश आले आहे.

गेल्या आर्थिक वर्षात १ एप्रिल २०२२ ते २८ फेब्रुवारी २०२३ या अकरा महिन्यांत एकूण २८८ कोटींची करवसुली झाली होती. त्यानंतर मार्च महिन्यातील पहिले दोन आणि शेवटचा एक अशा सरासरी तीन आठवड्यांमध्ये ६२ कोटींच्या वसुलीची भर पडली आहे. ग्रामपंचायतींकडील थकबाकीची काही प्रकरणे तडजोडीसाठी लोकअदालतीत ठेवली होती. त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाला ३१ कोटी ३९ लाख रुपयांचा रुपयांचा महसूल प्राप्त झाला होता. जिल्ह्यामधील ६१ हजार १७३ कुटुंबांकडे ग्रामपंचायत कराची मोठी थकबाकी होती. ही थकबाकी लोकअदालतींमुळे वसूल झाली आहे.

जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्यावतीने गावा-गावातील घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीसाठी आयोजित करण्यात आलेल्या लोकअदालतीतील तडजोडीतून ग्रामपंचायतींना ३१ कोटी ३९ लाख १ हजार ६३२ रुपयांची थकबाकी वसूल झाली आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील सर्वाधिक १२ हजार ८३७ खातेदारांनी मिळून एकूण ४२ लाख २८ हजार ८३२ रुपयांचा कर भरला आहे. या लोकअदालतीच्या माध्यमातून जिल्ह्यात सर्वाधिक ६ कोटी ५६ लाख ८७ हजार ५३५ रुपयांची कर वसुली ही मावळ तालुक्यात झाली असल्याचे पुणे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सचिन घाडगे यांनी सांगितले.

ग्रामपंचायत करवसुली दृष्टीक्षेपात...

- थकबाकीसह कराची एकूण रक्कम --- ४२४ कोटी ८० लाख रुपये

- एकूणमध्ये घरपट्टीची रक्कम --- ३६५ कोटी ८४ लाख रुपये

- पाणीपट्टीची थकीत रक्कम --- ५८ कोटी ९५ लाख ९० हजार रुपये

- एकूण घरपट्टी वसुली --- २९१ कोटी ९२ लाख रुपये

- एकूण पाणीपट्टी वसुली --- ४६ कोटी ३८ लाख रुपये



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply