पुण्यातून संशयित दहशतवाद्याला अटक; राज्य दहशतवाद विरोधी पथकाची दापोडी परिसरात कारवाई

पुणे : लष्कर ए तोएबा दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) दापोडी परिसरातून एका तरुणाला मंगळवारी अटक केली. संशयित दहशतवादी तरुणाला विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी ३ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

या प्रकरणी मोहम्मद जुनेद मोहम्मद अता  (वय २४, रा. दापोडी) याला अटक करण्यात आली असून दहशतवादी कारवाया करण्यासाठी त्याला जम्मू काश्मीरमधील दहशतवाद्यांनी पैसे पुरविल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. जुनेद गेल्या काही महिन्यांपासून समाजमाध्यमातून जम्मू काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या संपर्कात होता. दहशतवादी संघटनांसाठी तो पैसे गोळा करण्याचे काम करत होता. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर एटीएसच्या पथकाने दापोडीतून त्याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी करण्यात आली. तो दहशतवाद्यांच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. 

जुनेद मूळचा बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील गोंधनापूर गावातील रहिवाशी असून गेल्या दीड वर्षांपासून तो पुण्यात राहत होता. गेल्या दोन वर्षांत तो सहा वेळा काश्मीरमध्ये जाऊन आला होता. जुनेदच्या संपर्कात आणखी दोन ते तीन जण आहेत. जुनेद आणि त्याच्या साथीदारांनी गर्दीच्या ठिकाणांची पाहणी केली होती. तो आणि त्याचे साथीदार घातपाती कारवाया करण्याच्या तयारीत होते.  जुनेदने शस्त्रात्र चालविण्याचे तसेच स्फोटके वापरण्याचे प्रशिक्षण घेतल्याचाही संशय आहे. काश्मीरमधील दहशतवाद्यांनी अन्सार गझेवतुल हिंदू ताहीद असा समूह समाजमाध्यमावर करून राष्ट्रविरोधी कारवाया तसेच चिथावणी देणारे संदेश या समूहाद्वारे प्रसारित करण्यात आले होते. या समूहात जुनेद सामील झाला होता. त्यादृष्टीने तपास करायचा असल्याने पोलीस कोठडी देण्याची विनंती सरकारी वकील अ‍ॅड. विजयकुमार फरगडे यांनी युक्तिवादात न्यायालयाकडे केली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply