दारू पिण्यासाठी पत्नीचे दागिने चोरले ; पतीसह मित्र अटकेत; बिबवेवाडीतील घटना

पुणे : दारू पिण्यासाठी पत्नीचे दागिने चोरणाऱ्या पतीसह त्याच्या मित्राला बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ४१ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. रोहित अशोक बनसोडे (वय ३२, रा. अण्णाभाऊ साठेनगर, बिबवेवाडी), संदीप शिवाजी जाधव (वय २७, रा. टिळेकरनगर, कात्रज-कोंढवा रस्ता) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. बनसोडेला दारूचे व्यसन आहे. आरोपी संदीप जाधव त्याचा मित्र आहे. दारू पिण्यास पैसे नसल्याने बनसोडेने मित्र जाधवशी संगनमत केले. बनसोडेने पत्नीचे दागिने तसेच पाच हजारांची रोकड चोरली. घरात ठेवलेल्या डब्ब्यातून रोकड आणि दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर पत्नीने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. तक्रारदार महिलेच्या पतीला दारू पिण्याचे व्यसन असल्याची माहिती तपासात मिळाली. त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. चौकशीत बनसोडेने मित्र जाधव याच्याशी संगमनत करून दारू पिण्यासाठी पत्नीचे दागिने तसेच रोकड चोरल्याची कबुली दिली. बनसोडे आणि जाधवला अटक करण्यात आली. बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे, गुन्हे शाखेच्या निरीक्षक अनिता हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक प्रवीण काळोखे, किरण देशमुख, शाम लोहोमकर, अमित पुजारी, श्रीकांत कुलकर्णी आदींनी ही कारवाई केली.

Follow us -



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply