Sanjay Raut : “माफी मागून असे विषय सुटतात का?”, संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल

Sanjay Raut : मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची घटना घडल्यानंतर विरोधकांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राजकोट किल्ल्याला भेट दिली. यानंतर आज शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही राजकोट किल्ल्यावर जाऊन पाहणी केली. यावेळी संजय राऊतांनी सरकारवर हल्लाबोल केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर आपण शिवरायांची एकदा नाही १०० वेळा माफी मागायला तयार आहोत, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं होतं. यावर बोलताना संजय राऊतांनी घणाघाती टीका केली. “माफी मागून असे विषय सुटतात का? छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवण्याचं कंत्राट कोणी आणि कसं दिलं? या घटनेत आरोपी आपटे असले तरी मुख्य आरोपी त्यांना काम देणारे आहेत आणि ते ठाण्यातील आहेत”, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.

संजय राऊत काय म्हणाले?

“खरं म्हणजे दोन दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे देखील या ठिकाणी आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा झाकून ठेवलेला पुतळा आम्हाला दुर्देवाने पाहायला मिळतोय. लातूरच्या भूकंपानंतर हा एवढा मोठा आघात महाराष्ट्राच्या समाज मनावर झालेला आहे. महाराष्ट्रातून संतप्त प्रतिक्रिया येणं हे स्वाभाविक आहे. आता राजकोट किल्ल्यावरील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्यावतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. इतकं होऊन देखील हे राज्य सरकार गुन्हेगारांना पाठिशी घालण्याचा प्रयत्न होत आहे. कारण यामध्ये आर्थिक व्यवहार गुंतलेले आहेत. आपआपल्या माणसांना आणि ठेकेदांना काम देऊन सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांनाही सोडलं नाही. तेथील आसपासच्या घरांची कौलं पडली नाहीत. मग पुतळा कसा पडला?”, असा सवालही यावेळी संजय राऊत यांनी उपस्थित केला.

Ajit Pawar : “शिवरायांच्या नावाला साजेसं स्मारक उभारणार”; राजकोट किल्ल्याच्या पाहणीनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया; ठाकरे-राणे वादावर म्हणाले…

“छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी आणि काही अधिकारी इतके खोटे बोलत आहेत की त्यांना जनाची आणि मनाची उरलेली नाही. ते सांगता आहेत की, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वाऱ्यामुळे पडला. मग वाऱ्यामुळे तुमचे कॅमेरे उडाले नाहीत. तेथील बाकीचे सेड्स पडले नाहीत. त्या दिवशी वाऱ्यामुळे झाडं पडली नाहीत. मात्र, पुतळा पडला. मग किती खोटं बोलणार? हे सरकार भारतीय नौदलावर जबाबदारी ढकलत आहेत. भारतीय नौदलाने हिमालयावरही काही स्मारकं उभे केलेले आहेत. मग तेथे तर बर्फ वितळत असतो. तेथे देखील भारतीय नौदलाने काही पुतळे उभे केलेले आहेत. मात्र, या घटनेची जबाबदारी तुम्ही भारतीय नौदलावर ढकलता. तुम्ही तुमच्या पापाचं खापर भारतीय नौदलावर फोडता”, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.

“राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळ्याचे शिल्पकार कोणीतरी आपटे म्हणून आहेत. त्यांना अनुभवच नव्हता. ते आधी फक्त लहान-लहान मुर्ती बनवायचे. मात्र, त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवण्याचं कंत्राट कोणी आणि कसं दिलं? या घटनेत आरोपी हे आपटे असले तरी मुख्य आरोपी हे त्यांना काम देणारे आहेत आणि ते ठाण्यातील आहेत. आपटेंना सुपारी कोणी दिली? आपटेंना एवढा अनुभव नसतानाही त्यांना पुतळ्याचे काम कोणी दिले नसते”, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

माफी मागून असे विषय सुटतात का?

“छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर आपण शिवरायांची एकदा नाही १०० वेळा माफी मागायला तयार आहोत”, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं. यासंदर्भात बोलताना संजय राऊत यांनी म्हटलं की, “माफी मागून असे विषय सुटतात का? मग असे अनेक विषय माफी मागून सुटायला पाहिजेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत माफी मागून जर विषय सुटले असते तर मग ४० गद्दारांना माफी द्यायची का? आता हे प्रकरण राज्य सरकारच्या गळ्याशी आलेलं आहे. सरकारला तोंड दाखवायला जागा नाही. मुख्यमंत्री म्हणाले की मी १०० वेळा माफी मागायला तयार, पण तुमची माफी महाराष्ट्राने स्वीकारली पाहिजे ना?”, असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply