Rajgad Fort : किल्ले राजगडावर रात्रीच्या मुक्कामास बंदी

वेल्हे : किल्ले राजगड (ता. वेल्हे) या राज्य संरक्षित स्मारक परिसरात पर्यटकांना रात्रीचा मुक्काम करण्यास बंदी आदेशाची कठोर अंमलबजावणीसाठी पुरातत्त्व विभागाकडून भोर उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांना बुधवारी (ता. १५) पत्र देण्यात आले असून, तीन महिने कैदेची शिक्षा व पाच हजार दंडाची तरतूद केल्याची माहिती पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक, विलास वाहणे यांनी दिली आहे. मात्र, या निर्णयामुळे अनेक पर्यटक, दुर्गप्रेमींकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

या नोटीस पत्रानुसार एखाद्या संरक्षित स्मारकाचा कोणताही विशिष्ट भाग हा पुराणवस्तूशास्त्र अधिकारी, त्याचे अभिकर्ते, त्यांचा हाताखालील व्यक्ती व कामगार आणि अशा भागात कामावर असलेला कोणताही इतर सरकारी सेवक यांच्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तींसाठी कायमचा किंवा एखाद्या विशिष्ट मुदतीसाठी खुला असणार नाही.

राजगड किल्ला या राज्य संरक्षित स्मारकाच्या संरक्षित क्षेत्रात रात्रीच्या वेळेस मोठ्या प्रमाणात पर्यटक मुक्कामी राहत असतात. भोजन बनवून आनुषंगिक कचरा किल्ल्यावरच फेकून देतात. तसेच, महत्त्वाच्या वास्तूंच्या आडोशास शौचास बसतात. या सर्व बाबींमुळे किल्ल्यावर घाणीचे व दुर्गंधीचे साम्राज्य वाढत आहे. तसेच, स्मारकाच्या पावित्र्याला यामुळे धोका पोचला आहे. त्यामुळे या स्मारकाच्या संरक्षित क्षेत्रात रात्रीच्या वेळेस पर्यटकांना मुक्काम करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

याचे उल्लंघन करणाऱ्यास तीन महिने मुदतीच्या कैदेची शिक्षा किंवा पाच हजार रुपये दंडाची शिक्षा होईल किंवा या दोन्ही शिक्षा होतील. संबंधित पत्र ही वेल्हे तहसील कार्यालय, वेल्हे पोलिस स्टेशन, गुंजवणे व पाल बुद्रुक या ग्रामपंचायतींना देण्यात आले असल्याचे माहिती पुरातत्त्व विभागाकडून देण्यात आली आहे. या निर्णयामुळे अनेक दुर्गप्रेमी संघटना, पर्यटक यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करत आहेत.

किल्ले राजगड हा छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वाधिक काळ वास्तव्य असलेला किल्ला असून, स्वराज्याची पहिली राजधानी असल्याने महाराष्ट्रासह पूर्ण देशभरातून लाखो पर्यटक किल्ले राजगडवर येत असतात. एका दिवसात पूर्ण किल्ला पाहणे व फिरणे शक्य नाही. त्यामुळे आठवड्यातील काही दिवस मुक्काम करण्याची सोय व्हावी, अशी लेखी मागणी पुरातत्त्व विभागाकडे करणार आहे.

- महेश कदम, संस्थापक अध्यक्ष, शिवशंभू प्रतिष्ठान, कात्रज



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply